-तरच टिकेल नैसर्गिक समतोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 10:22 PM2019-03-02T22:22:39+5:302019-03-02T22:23:16+5:30
वन व वन्यप्राण्यांचे संरक्षण, संवर्धन व जतन करण्यासाठी सर्वसामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण केल्या जात आहे. परंतु, मानव आणि वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजनेची आज गरज निर्माण झाली आहे. यातूनच निसर्गातील समतोल टिकू शकतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वन व वन्यप्राण्यांचे संरक्षण, संवर्धन व जतन करण्यासाठी सर्वसामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण केल्या जात आहे. परंतु, मानव आणि वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजनेची आज गरज निर्माण झाली आहे. यातूनच निसर्गातील समतोल टिकू शकतो.
जंगलात वाघांचा अधिवास असणे हे समृद्ध जंगलाचे प्रतीक आहे. जगप्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्प यासंदर्भात लक्षवेधी ठरला. अन्नसाखळीतील वाघ हा मुख्यघटक आहे. वाघामुळे जंगलातील वनस्पती व इतर तृणभक्षी प्राण्यांमध्ये समतोल राखला जातो. वाघांची संख्या ज्या जंगलात अधिक ते जंगल किंवा तेथील परिसर परिपूर्ण मानला जातो. जंगल उत्कृष्ट असेल तर मानवी जीवन सुसह्य होण्यास कारणीभूत ठरते. वनसंपदेमुळे प्राणीमात्रांसाठी आॅक्सिजन, मुबलक पाणी व जमिनीची धूप थांबविण्यासही मदत होते. पर्यायाने जंगलासाठी सर्व वन्यजीव वाचविणे सर्वांचेच कर्तव्य आहे. वाघ हा नैसर्गिक जैविक साखळीतील महत्त्वाचा घटक आहे. व्याघ्र प्रकल्पासाठी घोषीत केलेले क्षेत्र हे निमसदाहरित जंगल असून ते दुर्गम व अति उतार, डोंगराळ व घनदाट असल्याने या भागात गवे, सांबर, रानडुक्कर व अन्य प्राण्यांचा संचार अधिक प्रमाणात असतो.
अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पाच्या विकासासाठी विविध योजना राबविताना यामध्ये मानवहित नजरेआड झाल्यास टोकाचा संघर्ष निर्माण होतो. वाघ व अन्य वन्यजीवांचे अस्तित्व कायम टिकविण्यासाठी प्रकल्प क्षेत्रात पोषक वातावरण तयार करावे. परिसरातील नागरिकांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविणे, यामध्ये सुसंवादाची आज गरज आहे.
निर्भरता कमी करावी
वन परिसर, अभयारण्य व व्याघ्र प्रकल्प परिसरात राहणाऱ्या लोकांच्या गरजा भागविण्यासाठी कोर क्षेत्रावर अवलंबून राहावे लागते. ही स्थिती बदलविण्याची गरज आहे. गावकऱ्यांच्या दैनंदिन गरजा गावातच पूर्ण व्हावे आणि जंगलावरील निर्भरता कमी करण्यासाठी आवश्यकतेनुसार नवीन योजनांची आखणी केली पाहिजे.
वाघांच्या अधिवास क्षेत्रात हवी सुधारणा
व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून वाघांचे संनियंत्रण व संख्येत वाढ होण्यासाठी त्यांच्या अधिवासामध्ये सुधारणा करावी. वन्यजीव संवर्धनाकरिता केंद्र शासनाने सन १९७२ पासून विशेषतत्वाने राबविण्यात येत असलेल्या शासन पुरस्कृत योजनेअंतर्गत राष्ट्रीय उद्याने व अभयारण्यांचा व्याघ्र प्रकल्पामध्ये समावेश केला आहे. भारतीय अधिनियम १९२७ अन्वये वनक्षेत्र व वन्यजीवांचे संरक्षण करता येते. वन (संवर्धन) अधिनियम १९८० या कायद्यात वनक्षेत्रांचे कामासाठी उपयोगाबाबत अनेक तरतुदी आहे. यावर आधारीत वाघांच्या अधिवास क्षेत्रात सुधारणेसाठी पाऊल उचलण्याची गरज आहे.