तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2017 12:28 AM2017-04-25T00:28:26+5:302017-04-25T00:28:26+5:30
आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक दिवशी नवनवीन ज्ञान उदयाला येत आहे. डिजिटल शाळांमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे.
संदीप गोडशेलवार : डिजिटल शाळेचे उद्घाटन
चंद्रपूर : आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक दिवशी नवनवीन ज्ञान उदयाला येत आहे. डिजिटल शाळांमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे. डिजिटल शाळांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल झाले आहे, असे प्रतिपादन भद्रावती पंचायत समितीचे सहायक संवर्ग विकास अधिकारी संदीप गोडशेलवार यांनी केले.
डिजिटल वर्गखोलीचे उद्घाटन गोडशेलवार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी रमण गुज्जनवार होते. यावेळी प्रमुख पाहुणे पंचायत समिती सदस्या अश्विनी ताजने, सुंदराताई कुळमेथे, सरपंच ग्रामपंचायत तिरवंजा सुनिता चन्ने, शिक्षण विस्तार अधिकारी मारोती रायपुरे, केंद्र प्रमुख, गणपत कारेकर उपसरपंच, राजू डाहुले अध्यक्ष शाळा व्यवस्था समिती, भास्कर ताजने, रवींद्र कारेकर, संजय राजूरकर, संभा वैद्य, राजू पेटकर, अर्चना पिंगे, माधुरी चौधरी, संजय कुळमेथे, ग्रामपंचायत सदस्य सरला चांदेकर आदी उपस्थित होते.
प्रत्येक व्यक्ती तंत्रज्ञानाच्या साह्याने नवनवीन कल्पना, नवे अध्यापन, अध्ययन तंत्र विकसित करीत आहे. क्षणात आपणास पडलेल्या प्रश्नांचे उत्तर माहिती तंत्रज्ञानाच्या जोरावर सहज मिळवतो. या ज्ञानाचे स्रोत डिजिटल तंत्रज्ञानात आहे. डिजिटल शाळा अशाच डिजिटल शाळेचे उद्घाटन भद्रावती पंचायत समिती अंतर्गत घोडपेठ बिटातील तिरवंजा (मोकासा) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे झाले.
यावेळी गटशिक्षणाधिकारी रमन गुज्जनवार म्हणाले की, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तिरवंजा ही शाळा भद्रावती तालुक्यातील उपक्रमशील व मुलांच्या जाणीव वृद्धिंगत करणारी, संस्काराचे मूल्य रूजवण करून बालकांचे अनुभव विश्व समृद्ध करणारी शाळा आहे. विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून ही शाळा सतत प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकत आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका अल्का ठाकरे यांनी केले. संचालन जयश्री कांबळे यांनी आणि आभार प्रदर्शन वैशाली वडेट्टीवार यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता शशिकांत रामटेके, मान्चामवार, दिगांबर गोकटे व शाळेतील शालेय मंत्रिमंडळातील विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले. (प्रतिनिधी)