तहसीलदार, मुख्याधिकारी उतरल्या रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:40 AM2021-02-26T04:40:41+5:302021-02-26T04:40:41+5:30
सावली : विनामास्क फिरणाऱ्यांविरुद्ध तालुका प्रशासनाने विशेष मोहीम सुरू केली आहे. सावली येथील तहसीलदार परीक्षित पाटील व मुख्याधिकारी मनीषा ...
सावली : विनामास्क फिरणाऱ्यांविरुद्ध तालुका प्रशासनाने विशेष मोहीम सुरू केली आहे. सावली येथील तहसीलदार परीक्षित पाटील व मुख्याधिकारी मनीषा वजाळे यांनी स्वत: रस्त्यावर उतरून विनामास्क फिरणाऱ्या ३७ जणांवर कारवाई करून ८४०० रुपयांचा दंड वसूल केला. या वेळी शहरातील बँका, दुकानांत जाऊन विनामास्क कुणालाही प्रवेश देऊ नये, अशा सूचनाही दिल्या.
जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढायला लागली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने वाढत्या रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी विशेष नियमावली बनवली आहे. तसेच शहरात विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश तालुका प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांच्या पथकांनी स्वत: रस्त्यावर उतरून विनामास्क फिरणाऱ्यांवर दंड आकारला. कोरोनाचे गंभीर्य लक्षात घेत त्यांचे समुपदेशन करताना विनामास्क फिरू नये, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, अशा सूचनाही दिल्या. तसेच शहरातील प्रत्येक गर्दीच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. शासकीय कार्यालये, खासगी बँका, दुकानदारांना विनामास्क येणाऱ्यांना प्रवेश देऊ नये, अशा सूचना दिल्या. ही कारवाई तहसीलदार परीक्षित पाटील, मुख्याधिकारी मनीषा वजाळे आणि नायब तहसीलदार कांबळे यांच्या पथकाने केली.