२५ हजाराची लाच घेताना तहसीलदार नीलेश खटके जेरबंद; नागपूर एसीबीची भद्रावतीत कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2021 10:28 PM2021-12-11T22:28:55+5:302021-12-11T22:30:16+5:30
तक्रारदार चंद्रपूर जिल्ह्यातील चिरादेवी सुठाणा (ता. भद्रावती) येथील रहिवासी आहे.
चंद्रपूर- नागपूर : शेतातील मातीचे उत्खनन आणि वाहतूकीच्या परवान्यासाठी २५ हजारांची लाच स्विकारताना तहसीलदार डाॅ. नीलेश निवृत्ती खटके (वय ३६) यांना रंगेहात पकडण्यात आले. भद्रावतीच्या तहसील कार्यालयात शनिवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
तक्रारदार चंद्रपूर जिल्ह्यातील चिरादेवी सुठाणा (ता. भद्रावती) येथील रहिवासी आहे. त्यांचा विटाभट्टीचा व्यवसाय आहे. त्यासाठी त्यांना स्वताच्या शेतातून ३०० ब्रास मातीचे उत्खनन करायचे होते. त्याकरिता यांनी भद्रावती तहसील कार्यालयात रितसर अर्ज करून रॉयल्टी तसेच अन्य शासकीय शुल्कापोटी ८८, २५६ रुपये जमा केले होते. त्यानंतर त्यांनी तहसीलदार नीलेश निवृत्ती खटके यांची भेट घेऊन मातीच्या उत्खनन आणि वाहतूकीच्या परवान्याची मागणी केली. हा परवाना देण्यासाठी तहसीलदार खटके यांनी १ लाख रुपयांची लाच मागितली. बरीच घासाघिस केल्यानंतर २५ हजारांवर तडजाेड झाली. ही लाच द्यायची नसल्याने वीटभट्टीधारकाने थेट नागपूर येथील एसीबीच्या कार्यालयात धाव घेतली.
शुक्रवारी १० डिसेंबरला त्यांची तक्रार नोंदवून घेतल्यानंतर शहानिशा करण्यात आली. दरम्यान, चंद्रपुरातून कारवाईचा सापळा लावल्यास लिक होण्याची भीती असल्याने एसीबीचे अधीक्षक राकेश ओला यांनी नागपुरातून शनिवारी भल्या सकाळी कारवाईसाठी पथक पाठविले. तहसील कार्यालयात सकाळी ११.३० च्या सुमारास तक्रारदाराकडून तहसीलदार खटके यांना २५ हजार रुपये स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. नंतर भद्रावती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. एसीबीचे अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक योगिता चापले, नायक रविकांत डहाट, अनिल बहिरे, निशा उमरेडकर, पोलीस शिपाई अमोल मेंगरे यांनी ही कारवाई केली.
तलाठी, मंडळ अधिकारीही जाळ्यात-
भद्रावती तालुक्यात भ्रष्टाचार वाढल्याने यंदाच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या कारवायातून दिसून येते. वर्षभरात भद्रावती महसूल विभागातील तलाठी, मंडळ अधिकारी आणि आता तहसीलदार यांना लाचेची रक्कम स्वीकारताना अटक करण्यात आली आहे.