बकूळ धवने तेजस्विनी सन्मानाची मानकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 11:04 PM2019-03-01T23:04:21+5:302019-03-01T23:04:46+5:30
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने भारतीय स्त्री शक्ती चंद्रपूरतर्फे दरवर्षी दिला जाणारा सुरूचि पोफळी स्मृती तेजस्विनी सन्मान यंदा चंद्रपुरातील उदयोन्मुख नाट्य अभिनेत्री बकूळ अजय धवने हिला प्रदान करण्यात येणार आहे. १० मार्च रोजी दुपारी ४.३० वाजता चंद्रपुरातील तुकूम परिसरातील न्यु इंडिया कॉन्व्हेंट येथे हा तेजस्विनी सन्मान सोहळा होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने भारतीय स्त्री शक्ती चंद्रपूरतर्फे दरवर्षी दिला जाणारा सुरूचि पोफळी स्मृती तेजस्विनी सन्मान यंदा चंद्रपुरातील उदयोन्मुख नाट्य अभिनेत्री बकूळ अजय धवने हिला प्रदान करण्यात येणार आहे. १० मार्च रोजी दुपारी ४.३० वाजता चंद्रपुरातील तुकूम परिसरातील न्यु इंडिया कॉन्व्हेंट येथे हा तेजस्विनी सन्मान सोहळा होणार आहे.
या समारंभाला अॅड. वर्षा जामदार यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून अध्यक्षस्थानी डॉ. शरदचंद्र सालफळे हे राहतील. यावर्षीची तेजस्विनी सन्मानाची मानकरी बकूळ धवने हिने अल्पवयात नाट्य क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल हा सन्मान तिला प्रदान करण्यात येणार आहे.राज्य बालनाट्य स्पर्धा, राज्य नाट्य स्पर्धा, कामगार नाटय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट अभिनयाची पारितोषिके तिने पटकाविली असून तिने अभिनित केलेली सर्वच नाटके स्पर्धांमध्ये अव्वल ठरली आहे. थेंबांचे टपाल, अनवाणी, भट्टी, तो एक उंबरठा, मन मनास उमगत नाही, चिंधी बाजार, ईदी, रंगबावरी, नथिंग टू से या नाटकांमधून तिने वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहे. कामगार राज्य नाटय स्पर्धेच्या नागपूर विभागीय प्राथमिक फेरीत सलग तीन वर्षे तिने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा प्रथम पुरस्कार प्राप्त करत हॅट्ट्रीक साधली.