Corona Virus in Chandrapur; सीमेलगतच तेलंगणातील कोरोनाबाधितांचा जिवतीवासीयांना धसका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 09:26 PM2020-04-09T21:26:20+5:302020-04-09T21:30:03+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्याला लागून असलेल्या तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यात दहा रुग्ण कोरोनाबाधित सापडल्याने जिवतीवासीयांत भीतीचे वातावरण बघायला मिळत आहे.
संघरक्षित तावाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्यात कोरोना रोगाने थैमान घातले असले तरी चंद्रपूर जिल्ह्यात अजून एकही कोरोना बाधित रुग्ण आढळला नाही आणि आढळू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतत काळजीही घेत आहे. मात्र जिल्ह्यातील जिवती तालुक्याला लागून असलेल्या तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यात दहा रुग्ण कोरोनाबाधित सापडल्याने जिवतीवासीयांत भीतीचे वातावरण बघायला मिळत आहे. त्याचे कारणही तसेच आहे जिवती तालुक्यातील सीमेवरील वादग्रस्त १४ गावे ही दोन्ही राज्यात येत असून येथील नागरिक हे चंद्रपूर आणि आदिलाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यातच या गावांचा व्यवहार, संपर्क हा दोन्ही राज्यात नित्याचाच असतो.
तेलंगणातील आदिलाबाद जिल्हा हा चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुका सीमेला लागून असून सध्या या जिल्ह्यात कोरोनाचे दहा रुग्ण सापडले आहेत. सीमेवरून वीस ते पंचवीस किमी अंतरावरील हसणापूर (जिल्हा आदिलाबाद) गावात यापैकी एक रुग्ण असल्याने आणि सीमेवरील १४ गावांचा नेहमी संपर्क येत असल्याने त्याचा संसर्ग आपल्याकडे तर येणार नाही ना असे तर्कवितर्क ऐकायला मिळत आहे. सीमेवरील लोकांचे बँक व्यवहार दोन्हीकडे येतात. त्यामुळेसुद्धा एकमेकांचा संपर्क येणार तर नाही ना, अशी भीती लोकांत आहे. तालुका प्रशासनाने याची काळजी सुरुवातीलाच घेतली आहे. सीमेवर प्रत्येक ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. परमडोली, येलापूर, लेंडीगुंडा याठिकाणी नाकाबंदी असून पोलिसांसोबत त्या त्या गावातील नागरिकही बंदोबस्तासाठी पहारा देत आहेत. जिवती तहसीलदार तसेच ठाणेदार यांच्याकडूनही सदर १४ गावातील नागरिकांत सध्या तेलंगणात जाऊ नका, घाबरण्याचे काही कारण नाही याबद्दल जनजागृती करण्यात येत आहे.
सीमेवरील प्रत्येक ठिकाणी पोलीस व गावकऱ्यांचा बंदोबस्त ठेऊन पहारा लावण्यात आला आहे. घाबरण्याचे काही कारण नाही. घराबाहेर जाणे टाळावे.
- महेश देवकते, उपसभापती, पं.स.जिवती
कुंभेझरी ग्रामपंचायतीकडून तहसीलदाराला निवेदन
सीेमेवरील लोकांना दोन्ही राज्यात राशन सुविधा असून येथील लोक हे दोन्हीकडे राशन आणण्यासाठी जात आहेत. विशेष म्हणजे, केरामेरी मंडलमध्ये एक कोरोना रुग्ण आढळला आहे. त्यामुळे आपल्या तालुक्यात याचा धोका होऊ नये, यासाठी सीमामार्ग बंद करा, अशा आशयाचे निवेदन कुंभेझरी ग्रामपंचायतीने तहसीलदार जिवती यांना दिले आहे.