ठाण्यातील दूरध्वनी बनले शोभेची वस्तू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:29 AM2021-04-07T04:29:22+5:302021-04-07T04:29:22+5:30
चिमूर : कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासह जिल्ह्यात कुठेही आणि कोणतीही घटना घडली, तर सर्वात आधी ठाण्यातील टेलिफोन क्रमांकावर ...
चिमूर : कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासह जिल्ह्यात कुठेही आणि कोणतीही घटना घडली, तर सर्वात आधी ठाण्यातील टेलिफोन क्रमांकावर फोन करून माहिती दिली जाते, परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील ३५ पैकी अनेक पोलीस ठाण्यातील टेलिफोन बंद अवस्थेत असल्याने, नागरिकांना ठाण्यापर्यंत माहिती पोहोचविणे कठीण जात आहे. हे टेलिफोन नेमके कशामुळे बंद झाले की, बंद केले, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
जिल्ह्यात चंद्रपूर येथे रामनगर व शहर ठाणे स्वतंत्र आहेत. त्याचबरोबर, पडोली, घुग्घुस, राजुरा, गडचांदूर, कोरपना, जिवती, ढाबा, गोंडपिपरी, पोंभुर्णा, बल्लारपूर, मूल, सावली, सिंदेवाही, पाथरी, ब्रह्मपुरी, नागभीड, भद्रावती, वरोरा, मांजरी, शेगाव, चिमूर व भिसी व उपपोलीस ठाणे मिळून जिल्ह्यात एकूण ३५ पोलीस ठाणे कार्यरत आहेत. पोलीस प्रशासनाकडून पूर्वीपासूनच जिल्ह्यातील ३५ ठाण्यात भारतीय दूर संचार निगमचे टेलिफोनचा वापर केल्या जातो. जिल्ह्यात घडणाऱ्या घटनांची माहिती तत्काळ पोलीस प्रशासनास मिळावी, यासाठी टेलिफोन महत्त्वपूर्ण मानल्या जातो. येथील बहुतांश पोलीस ठाण्यातील टेलिफोन बंदच असल्याने, ग्रामीण भागात कार्यरत असलेले पोलीस पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्षासह नागरिकांना माहिती देणे कठीण झाले आहे. सध्या दूरध्वनीचा वापर वाढला असला, तरी टेलिफोनचे महत्त्व अजूनही तेवढेच आहे. अनेक वेळा दूरध्वनीला तांत्रिक अडचण, नेटवर्कचा अडसर येतो. त्यामुळे ठाण्यात टेलिफोन कार्यान्वित असणे अत्यावश्यक आहे, परंतु पोलीस विभागाने या यंत्रणेकडे सातत्याने कानाडोळा केल्याचे दिसून येते.
बॉक्स
कोरोनात पोलिसांची भूमिका महत्त्वाची
जिल्ह्यात मागील पंधरवड्यापासून कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. अशा काळात आरोग्य यंत्रणेसह पोलीस यंत्रणाही तेवढीच महत्त्वपूर्ण आहे. या काळात नागरिकांच्या सुरक्षितेची जबाबदारी वाढली आहे. ही जबाबदारी पोलिस यंत्रणा समर्थपणे पेलत आहे. ग्रामीण भागातून ठाण्यात माहिती मिळाल्यानंतर पोलीस यंत्रणा पाऊल उचलते. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील सर्व ३५ पोलीस ठाण्यापैकी बरेच बंद असलेल्या ठाण्याचे टेलिफोन सुरू होणे अत्यावश्यक झाले आहे. त्यासाठी पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.