सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:34 AM2021-07-07T04:34:32+5:302021-07-07T04:34:32+5:30
चंद्रपूर : यावर्षी अगदी मृग नक्षत्रामध्येच पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. सर्व दु:ख विसरून, इकडून-तिकडून पैशाची ...
चंद्रपूर : यावर्षी अगदी मृग नक्षत्रामध्येच पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. सर्व दु:ख विसरून, इकडून-तिकडून पैशाची जुळवाजुळव करून पेरणी केली. मात्र, पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून सोयाबीन तसेच अन्य पिकांची वाढ खुंटली आहे. दरम्यान, दुबार पेरणी करण्याची वेळ आल्यास करायचे काय, असा प्रश्न असून सांग, सांग भोलनाथ पाऊस पडेल काय, अशी विचारणा सद्यस्थितीत शेतकरी करीत आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात धान, सोयाबीन, कापूस यासह अन्य पिकांची लागवड केली जाते. कपाशीला नियमित तर सोयाबीनला मध्य स्वरुपाचा पाऊस पाहिजे आहे. विशेषत: धान पट्ट्यामध्ये अधिक पावसाची गरज आहे. यावर्षी पावसाने अगदी मृगात हजेरी लावली. त्यामुळे प्रत्येकांच्याच आशा पल्लवीत झाल्या. हवामान खात्यानेही यावर्षी भरपूर पाऊस कोसळेल, असा अंदाज व्यक्त केला. मात्र, यावर्षी तो खोटा ठरत आहे. मागील आठवडाभर तर उकाड्यामुळे नागरिक अक्षरश: हैराण झाले. रविवारी तसेच सोमवारी आकाशात ढग झाले. मात्र, ढगांच्या तुलनेत पाऊस कोसळलाच नाही. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची निराशा झाला आहे.
जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती, राजुरा, कोरपना आदी तालुक्यांत मोठ्या प्रमाणात कपाशीची पेरणी करण्यात आली. मात्र, योग्य आणि नियमित पाऊस नसल्याने कपाशीची वाढ खुंटली आहे. त्यातच काही शेतकऱ्यांनी खताची मात्राही दिली आहे. त्यामुळे कपाशी जळणार तर नाही ना, अशी भीती आहे. तर सोयाबीनची अवस्था बिकट आहे. काही शेतात सोयाबीन उगवले. मात्र, सध्या पावसाअभावी तो कोमेजला आहे. तर काही ठिकाणी भरपूर पावसाअभावी ते उगवलेच नाही. त्यामुळे दुबार पेरणी करावी लागेल, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पावसासाठी सध्या शेतकरी आकाशाकडे टक लावून बसले आहेत.
बाॅक्स
सोयाबीनचा पेरा वाढला
जिल्हा धान उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, काही तालुक्यात कापूस तसेच सोयाबीनची पेरणी केली जाते. कापूस पेरणीनंतर मशागतीचा मोठ्या प्रमाणात खर्च येतो. त्यातच मजूरसुद्धा भरपूर प्रमाणात लागतात. त्या तुलनेमध्ये कापसाचे उत्पन्न तसेच भावसुद्धा नसल्यामुळे शेतकरी आता कमी खर्चाच्या पिकांकडे वळले असून यामध्ये सोयाबीनला अधिक महत्त्व दिले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात यावर्षी सोयाबीनचा पेरा वाढला आहे.
बाॅक्स
तर दुबार पेरणी...
मृगात पाऊस कोसळल्यामुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादकांनी लगबग करीत पेरणी केली. त्यामुळे कपाशीचे बऱ्यापैकी पीक आहे. मात्र, सोयाबीनची वाढ पाहिजे तशी झाली नसल्याने तसेच काहींच्या शेतातील सोयाबीन पावसाअभावी उगवलेच नसल्याने दुबार पेरणी करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.
कोट
देव अशी परीक्षा का घेतो
दरवर्षी या ना त्या कारणामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. यावर्षी पाऊस भरपूर कोसळेल, असा हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला होता. मात्र, यावर्षी पावसाने दगा दिला. त्यामुळे दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर येऊ शकते. खत, बी-बियाणे महागले आहे. त्या तुलनेत शेतमालाला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची जगायचे तरी कसे, असा प्रश्न आहे.
-दादा चहारे, चंद्रपूर
कोट
दिवसेंदिवस शेती परवडत नाही. सर्वच महाग झाले आहे. त्यातच निसर्गसुद्धा साथ देत नाही. एखाद्या वर्षी निसर्गाने साथ दिली तर सरकार शेतपिकाला भाव देत नाही. त्यामुळे शेती करणे सोडून द्यावे वाटते. सरकारने शेतपिकांना योग्य भाव तसेच सिंचनाची सुविधा करून दिल्यास काही प्रमाणात लाभ मिळू शकेल.
दिवाकर मडावी, चंद्रपूर
बाॅक्स
जिल्ह्यातील सध्याची स्थिती
आतापर्यंत अपेक्षित पाऊस-११९६
प्रत्यक्ष झालेला पाऊस-३०९.३
आतापर्यंत झालेली पेरणी
--