बाबांच्या श्रमसंस्कार छावणीची सांगता

By admin | Published: May 28, 2016 01:13 AM2016-05-28T01:13:56+5:302016-05-28T01:13:56+5:30

राष्ट्रसंतांच्या संदेशाचा व विचारांचा अंगीकार करीत सोमनाथ लगतच्या कुष्ठधाम परिसरात सहभागी झालेल्या शेकडो युवक-युवतींच्या श्रमसंस्कार छावणी शिबिराची सांगता झाली.

Telling about the labor camps of Baba | बाबांच्या श्रमसंस्कार छावणीची सांगता

बाबांच्या श्रमसंस्कार छावणीची सांगता

Next

तापमानावर उत्साहाची मात : देशभरातील शेकडो युवक-युवती सहभागी
मूल : राष्ट्रसंतांच्या संदेशाचा व विचारांचा अंगीकार करीत सोमनाथ लगतच्या कुष्ठधाम परिसरात सहभागी झालेल्या शेकडो युवक-युवतींच्या श्रमसंस्कार छावणी शिबिराची सांगता झाली.
देशाचा आधार असलेल्या युवकांना श्रमाचे महत्व कळावे, श्रमदानातून एक कल्पना साकार होवून त्याचा उपयोग इतरांना व्हावा, हा उद्देश समोर ठेवून ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी श्रमसंस्कार छावणीची मुहूर्तमेढ रोवली. वरोरा येथील महारोगी सेवा समितीद्वारा दरवर्षी उन्हाळ्यात सदर शिबिराचे आयोजन करण्यात येते. सूर्याची दाहकता दिवसेंदिवस वाढत असताना राज्याच्या ३३ जिल्ह्यातून सहभागी झालेले ५७० युवक-युवती आणि काही वयस्क मंडळी बाबांनी दिलेला ‘हात लगे निर्माण मे, नही मारणे-नही मांगणे, या नाऱ्याला ओ देत शिबिरात सहभागी झाले. गाव, मित्र, कुटुंब, आरामदायी जीवन, आपसातील मतभेद आणि उन्हाळ्याच्या दिवसात घेतल्या जाणाऱ्या गार हवेला दूर सारून शेकडो किलोमीटर अंतरावरील निसर्गरम्य परिसरात रखरखत्या उन्हात ही मंडळी श्रमदानात रमून जात होती. लगतच्या पडझरी गावात गटार व रस्त्याची स्वच्छता आणि प्रकल्पाच्या परिसरात तलावाचे खोलीकरण व शेतीची मशागत करून बाबांच्या स्वप्नांना मूर्तरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
शिबिराची सुरूवात डॉ. भारती आमटे यांनी ध्वजारोहण आणि बाबा आमटे तथा साधनाताई आमटे यांना आदरांजली वाहून केली. यावेळी शिबिरार्थी युवकांनी भारत जोडोची गिते गावून बाबांच्या आठवणींना उजाळा देत वातावरण भारावून टाकले. सिंधुदुर्ग आणि वाशिम जिल्हा वगळता राज्याच्या सर्वच जिल्ह्यातील जवळपास ५७० शिबिरार्थी शिबिरात सहभागी झाले होते, श्रमदानानंतरच्या दुपारच्या बौद्धिक सत्रात डॉ. विकास आमटे यांनी आनंदवन एक प्रयोग, प्राचार्य सोमनाथ रोडे यांनी बाबा आमटे आणि युवक या विषयावर तर कौस्तुभ आमटे यांनी समाजभान अभियानाची माहिती देऊन युवकांना ग्रामीण भागात काम करण्याचे आवाहन केले. सायंकाळच्या सांस्कृतिक कार्यक्रमात राज्यभरातून आलेल्या शेकडो शिबिरार्थ्यांनी आणि आनंदवनातील अंध व अपंग बालकांनी स्वरानंदवन सादर करून कलेचा अविष्कार दाखविला. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, उपविभागीय पोलीस अधिकारी बाबाराव महामुनी, उपविभागीय अधिकारी मनीषा दांडगे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिबिरास भेट देऊन शिबिरार्थ्यांचे मनोधैर्य वाढविले. शिबिरादरम्यान बाबांच्या कार्याचा परिचय होण्याच्या उद्देशाने प्रकाशवाट आणि आनंदवन यावर आधारित चित्रप्रदर्शनी व माहितीपट दाखविण्यात आला. महाविद्यालयीन युवक-युवतीशिवाय सदर शिबिरात डॉक्टर, वकील, इंजिनिअर, चार्टर्ड अकाऊंटंट, प्राध्यापक, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते आदी विविध क्षेत्रातील वयस्क मंडळी सहभागी झाली होती.
शिबिर काळात शिस्तबद्धता आणि गैरसोय टाळण्यासाठी शिबिरार्थ्यांचा गट निर्माण करून श्रमदान केले. शिबिराचा समारोप डॉ. विकास आमटे यांच्या उपस्थितीत वृक्षदिंडीने झाला. यावेळी शिबिरार्थ्यांना रोपांचे बियाणे वितरित करून वृक्ष संवर्धनाचे आवाहन केले. डॉ. विकास आमटे आणि डॉ. कौस्तुभ आमटे यांच्या मार्गदर्शनात शिबिर संयोजक रवींद्र नलगंटीवार, हरिभाऊ बढे, अरुण कदम, विजय जुमडे यांनी प्रयत्न केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Telling about the labor camps of Baba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.