एक दिवसात तापमान ४.६ अंशाने घसरले

By Admin | Published: June 6, 2016 01:54 AM2016-06-06T01:54:55+5:302016-06-06T01:54:55+5:30

मागील आठ दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिक वाढत्या तापमानाने होरपळून निघत होते. अशातच शनिवारी

Temperature dropped by 4.6 degree in one day | एक दिवसात तापमान ४.६ अंशाने घसरले

एक दिवसात तापमान ४.६ अंशाने घसरले

googlenewsNext

चंद्रपूर : मागील आठ दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिक वाढत्या तापमानाने होरपळून निघत होते. अशातच शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास चंद्रपूरसह जिल्ह्यातील अनेक भागात विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस कोसळला. सुमारे पाऊण-एक तास पावसाने झोडपून काढले. विजेमुळे जिल्ह्यात कुठेही जिवितहानी झाल्याची माहिती नाही. मात्र शेकडो झाले उन्मळून पडली. अचानक झालेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन होरपळणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला. विशेष म्हणजे, शनिवारी ४३.६ अंश सेल्सीयस तापमानाची नोंद झाली होती. रविवारी ३९ अंश सेल्सियस तापमान होते. म्हणजे एक दिवसात तब्बल ४.६ अंशाने तापमान घसरले.
मागील आठ ते दहा दिवसांपासून चंद्रपूरकर वाढत्या उष्णतामाने त्रस्त आहेत. सूर्य अक्षरश: आग ओकत आहे. ४६.८ अंशापार तापमानाची नोंदही याच दिवसात झाली आहे. आजपर्यंत उष्माघाताने जिल्ह्यातील सहा जणांचा बळी गेला आहे. सकाळी ८ वाजेपासूनच उन्हाची काहिली जाणवत असल्याने दुपारी तर नागरिकांनी घराबाहेर पडणेच बंद केले होते.
आणखी किती दिवस सूर्याचा कोप अंगावर झेलावा लागणार, याची चिंता चंद्रपूरकर करू लागले होते. काल शनिवारीदेखील दिवसभरच कडाक्याचे उन्ह पडले. ४३.६ अंश सेल्सीयस तापमानाची नोंद करण्यात आली. रात्री १० वाजताच्या सुमारास अचानक वातावरणात फरक पडला. विजेच्या कडकडाटासह जोरदार वादळ सुरू झाले. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली.
चंद्रपूरसह जिल्ह्यातील सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी, मूल, कोरपना, बल्लारपूर, राजुरा, जिवती, भद्रावती आदी तालुक्यात विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस कोसळला.
अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. यावेळी वादळाचा जोरही मोठा असल्याने ग्रामीण भागातील अनेक घरांचे छप्पर उडाले. चंद्रपुरातील कस्तुरबा मार्गावरील, त्यानंतर रामनगर मार्गावरील व रामनगर ते दाताळा मार्गावरील अनेक झाडे उन्मळून पडली. जिल्ह्यातील विविध भागातील शेकडो झाडेही उन्मळून पडल्याची माहिती आहे. चंद्रपुरात पावसाला सुरूवात झाल्यानंतर काही वेळातच वीज पुरवठा खंडित झाला. जवळपास अर्धा तास वीज पुरवठा खंडित राहिला. अर्धा-पाऊण तास पावसाचा जोर कायम होता. हा पाऊस सर्वत्र झाल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. एरवी सकाळीच अंगाची लाहीलाही करणारी उन्ह आज रविवारी जाणवत नव्हती. शनिवारी झालेल्या पावसामुळे रविवारी तापमानातही घट झाली. (शहर प्रतिनिधी)

नागभीड : शनिवारी रात्री अचानक आलेल्या वादळाचा तालुक्यातील पारडी (ठवरे) या गावाला चांगलाच फटका बसला. या वादळाने सात-आठ घरांचे छप्पर तर उडालेच पण एक झाड उन्मळून पडल्याने एक म्हैसही ठार झाली. शंकर गणपत ठाकरे, रमेश नत्थू ठाकरे, रामचंद्र दुधनकर, ईश्वर रामचंद्र ठवरे, होमराज दोनोडे, पुंडलिक दुधनकर यांच्या घरावरील टीन आणि कवेलू वादळाने पार उडून गेली. तर लवाजी तुकाराम ठवरे यांनी घरासमोरील चिचेच्या झाडाला बांधून ठेवलेली एक म्हैस अंगावर झाड पडल्याने जागीच ठार झाली.पिडीतांना त्वरीत नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी उपसभापती मंदा मेंदाम यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Temperature dropped by 4.6 degree in one day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.