मालमत्ता करात दहा टक्के दरवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:55 AM2020-12-11T04:55:25+5:302020-12-11T04:55:25+5:30
वरोरा : कोरोनामुळे नागरिक आर्थिक संकटात असताना वरोरा नगर परिषदेने यावर्षी मालमत्ता करात दहा टक्के करवाढ केली आहे. पूर्वीच ...
वरोरा : कोरोनामुळे नागरिक आर्थिक संकटात असताना वरोरा नगर परिषदेने यावर्षी मालमत्ता करात दहा टक्के करवाढ केली आहे. पूर्वीच कोरोनामुळे नागरिक आर्थिक संकटात असताना दरवाढ केल्याने नागरिकांपुढे मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे दहा टक्के करवाढ रद्द करण्याची मागणी माजी नगराध्यक्ष विलास टिपले यांनी केली आहे. कोरोनामुळे एप्रिल महिन्यांपासून पाच-सहा महिन्याच्या लॉकडाऊनमुळे नागरिकांवर मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट आले आहे. अनेकांचा रोजगार गेला आहे. छोटे-मोठे व्यावसायिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत वरोरा नगर परिषदेने यावर्षीपासून मालमत्ता कर दहा टक्क्यांनी वाढविला आहे. त्याचा सर्वानाच मोठा फटका बसला आहे. त्यामुळे वरोरा नगरपालिकेने सर्वसाधारण सभेत ठराव करून केलेली दरवाढ तात्काळ रद्द करावी, गरीब मालमत्ताधारकांना, झोपडपट्टीवासियांना त्यांच्या पाणीपट्टी व मालमत्ता करात पन्नास टक्के सूट देण्यात यावी, थकित कराच्या व्याजाची, दंडाची पूर्ण रक्कम माफ करण्यात यावी, सक्तीने कर वसुली करू नये, अशी मागणी निवेदनातून केली आहे. वरोरा नगर परिषदेचे अध्यक्ष अहतेशाम अली, विरोधी पक्षनेते गजानन मेश्राम, मुख्याधिकारी विजय देवळीकर यांच्याशी चर्चा करुन टिपले यांनी निवेदन दिले. याप्रसंगी कॉंग्रेसचे सचिव मनोहर स्वामी, उपाध्यक्ष सलीम पटेल उपस्थित होते.