चंद्रपूरमध्ये भीषण अपघातात 10 जण ठार, 5 गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2018 12:29 AM2018-12-09T00:29:15+5:302018-12-09T00:38:31+5:30
कोरपना-वणी मार्गावरील घटना; जखमींवर उपचार सुरू
चंद्रपूर : कोरपना- वणी मार्गावर कोरपनापासून 2 किमी अंतरावरील हेटी गावाजवळ भरधाव ट्रक व रिक्षामध्ये झालेल्या भीषण अपघातात 10 जण ठार झाले असून 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत पावलेले सर्वजण यवतमाळचे रहिवासी आहेत. यामध्ये रिक्षाच्या चालकाचाही समावेश आहे.
वणीकडून कोरपनाकडे भरधाव येणाऱ्या ट्रकचा टायर फुटला. अशातच ट्रक अनियंत्रित होऊन विरुद्ध दिशेने येणाऱ्या रिक्षाला धडकला. ही रिक्षा यवतमाळ जिल्ह्यातील महागावमधून मजुरांना घेऊन जात होती. कोरपना येथील विदर्भ कॉटन जिनिंगमध्ये मजुरीचे काम मिळेल या आशेने यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील मजुरवर्ग आला होता. मात्र काम उपलब्ध नसल्याने ही मंडळी कोरपना येथून एम एच 29 टी 8582 क्रमांकाच्या रिक्षाने स्वगावी कोरपना-वणी मार्गाने परत जात होती. सुमारे 2 किमी अंतरावर जाताच काळाने त्यांच्यावर घाला घातला. विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या एमएच 29 इ 1683 क्रमांकाच्या ट्रकचा टायर फुटल्याने ट्रक अनियंत्रित होऊन रिक्षावर धडकला. धडक इतकी भीषण होती की, यामध्ये रिक्षा चालकासह 15 ही जण वाहनात दबले. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. घटनेची माहिती मिळताच कोरपनाचे पोलीस निरीक्षक नरेंद्र कोसरकर यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली.
दीड वर्षांची मुलगी बचावली
या अपघातातून रिक्षामधील एक दीड वर्षांची मुलगी सुखरूप वाचली. काळ आला पण वेळ आली नव्हती याउ क्तीप्रमाणे ही चिमुकली या अपघातातून बचावली.