लैगिंक शोषण करणाऱ्या आरोपीला दहा वर्षांची शिक्षा
By Admin | Published: March 1, 2017 12:40 AM2017-03-01T00:40:00+5:302017-03-01T00:40:00+5:30
एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेत शारीरिक शोषण करणाऱ्या आरोपीस जिल्हा सत्र न्यायाधीश के.एल. व्यास यांनी मंगळवारी दहा वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली.
चंद्रपूर : एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेत शारीरिक शोषण करणाऱ्या आरोपीस जिल्हा सत्र न्यायाधीश के.एल. व्यास यांनी मंगळवारी दहा वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. आशिष भरत गजभिये नांदगाव जानी ता. ब्रह्मपुरी असे आरोपीचे नाव आहे.
आरोपी व पीडित मुलगी ही दुर्गापूर येथे शेजारी राहत होते. त्यातूनच त्यांची ओळख निर्माण झाली. या ओळखीला प्रेमाचे वलय देत आरोपीने त्या मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले व तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. घटनेची माहिती होताच मुलीच्या कुटुंबियांनी गडचांदूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी कलम ३६३, ३६६ (अ), ३७६ (२)(१), १०९ भादंवी सहकलम ३, ४ बाल लैगिंक अत्याचार संरक्षण कायदा अन्वये गुन्हा नोंद केला. सहायक पोलीस निरीक्षक एन.एन. उईके यांनी गुन्ह्याचा तपास पूर्ण करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.
सुनावणी दरम्यान या प्रकरणात न्यायालयाने साक्षीदार तपासले व आशिष भरत गजभिये याला कलम २७६ (२)(१)(१) भादंवि मध्ये १० वर्ष शिक्षा व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी शिक्षा व कलम ३, ४ बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम कायद्यान्वये सात वर्ष शिक्षा सुनावली. सरकारतर्फे अॅड उराडे यांनी तर पैरवी म्हणून पोलीस हवालदार भास्कर किन्नाके यांनी काम पाहिले. (स्थानिक प्रतिनिधी)
शारीरिक शोषण करणाऱ्यास शिक्षा
चंद्रपूर : पोलीस स्टेशन भिसी अंतर्गत येणाऱ्या शंकरपूर येथील राजेश शौकनदास गायकवाड (४३) याला मुलीचे शारीरिक शोषण केल्याप्रकरणी वरोऱ्याचे सत्र न्यायाधीश तथा अतिरिक्य सत्र न्यायाधीश मेहता यांनी दहा वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. आरोपी राजेश शौकनदास गायकवाड याने आपल्याच परिचयातील मुलीचे वारंवार शारीरिक शोषण केले. इतरांना याबाबत काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देत होता. आरोपीचे हे कृत्य बऱ्याच दिवसांपासून सुरू होते. अखेरीस पीडित मुलीने अत्याचारास कंटाळून पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी कलम ३७६ (२) (ए) (एन), ५०६ भादंवि अन्वये गुन्हा नोंद केला. सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन ठाणेदार सिद्धानंद मांडवकर यांनी पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.सुनावणी दरम्यान न्यायालयाने साक्षीदार तपासले व आरोपी राजेश शौकीनदास गायकवाड (४३) रा. शंकरपूर यास कलम ३७६ (२)(ए)(एन) भादंवि मध्ये दहा वर्षा शिक्षा व पाच हजार रुपये दंड व कलम ५०६ भादंवि मध्ये सहा महिने शिक्षा व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.