सायकलची खरेदी करण्याकडे कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:20 AM2021-06-24T04:20:12+5:302021-06-24T04:20:12+5:30
चंद्रपूर : कोरोनामुळे रोगप्रतिकारक क्षमता चांगली ठेवण्यासाठी अनेकांची धडपड सुरु आहे. त्यामुळे अनेकजण नियमित व्यायाम, भोजनाकडे लक्ष देत आहेत. ...
चंद्रपूर : कोरोनामुळे रोगप्रतिकारक क्षमता चांगली ठेवण्यासाठी अनेकांची धडपड सुरु आहे. त्यामुळे अनेकजण नियमित व्यायाम, भोजनाकडे लक्ष देत आहेत. दररोज सायकलिंग केल्यास रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत मिळते तसेच आरोग्य सुरळीत राहते. त्यामुळे अनेकांचा सायकल खरेदीकडे कल वाढला आहे.
पावसात भिजणे आरोग्यासाठी धोकादायक
चंद्रपूर : पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. अनेकजण आनंद घेण्यासाठी पावसात भिजत असतात. मात्र त्यामुळे सर्दी, खोकला, ताप होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसात भिजणे टाळावे, असे आरोग्य विभागाने कळविले आहे. अनेक युवक भर पावसात सुसाट वेगाने वाहने पळवितात. त्यामुळे दुचाकी घसरुन अपघात होण्याची शक्यता असते.
कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या
चंद्रपूर : कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच इतर संसर्गजन्य आजारही वाढीस लागले आहेत. त्यामुळे कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी प्रतिकारशक्ती वाढवा, हंगामातील ताजी फळे खाणे किंवा त्यांचा रस प्या, पालेभाज्यांचा रोजच्या आहारात समावेश करा, जेवणातील सर्व पदार्थ ताजे व गरम खा, जेवणाच्या वेळांचे पालन करा, पालेभाज्या, कडधान्यांचा अधिक वापर करा, असा सल्ला जिल्हा आरोग्य विभागाने दिला आहे.
औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्या बाजारात
चंद्रपूर : येथील बाजारपेठेत रुचकर, चवदार आणि औषधी गुणधर्मामुळे नावारूपाला आलेल्या रानभाज्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. पावसाळ्यात मिळणाऱ्या या भाज्या खरेदीला चंद्रपूरकर पसंती देत आहेत. कुड्याची फुले, पातूर, तरोटा अशा विविध प्रकारच्या भाज्या बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत. या भाजीमध्ये औषधी गुणधर्म असतात, तसेच चवीसाठी चांगल्या असतात. त्यामुळे या रानभाज्यांची मागणी मोठ्या प्रमाणात असते. चंद्रपूर शहरालगत असलेल्या ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर या रानभाज्या विक्रीसाठी आणत आहेत.
अंगणवाड्यांना मिळणार २४ तास वीजपुरवठा
चंद्रपूर : जि. प. महिला व बालकल्याण विभागामार्फत जिल्ह्यातील ४०८ अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच लावण्यात आले आहेत. त्यामुळे केंद्रांना आता २४ तास विद्युत पुरवठा करता येणार आहे. गावातील अंगणवाडी अंतर्गत बालकांना आनंददायी शिक्षणाचे संस्कार मिळावेत म्हणून जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांना सर्व सुविधा युक्त करण्याचे काम सुरु आहे. अंगणवाडी केंद्रांमध्ये विद्युत पुरवठा, पंखा, बल्ब, एलईडी टीव्ही बालकांची खेळणी, बाल आकार साहित्य यासह सौर ऊर्जा संचाचा पुरवठा करण्यात आला आहे.
जलस्त्रोताची तपासणी करावी
चंद्रपूर : पावसाळ्याचे दिवस सुरु झाल्याने दूषित पाण्यामुळे विविध रोग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील जलस्त्रोतांची तपासणी करावी, अशी मागणी आहे. पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे कॉलरा, हगवण, पोटदुखी असे विविध आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे विहीर, बोअरवेल, हातपंप, नळ आदी जलस्त्रोतांची तपासणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
पोलीस भरती प्रशिक्षण राबवावे
चंद्रपूर : नुकतीच गृहमंत्र्यांनी पोलीस भरती करण्याची घोषणा केली. त्यामुळे युवकांमध्ये आनंद निर्माण झाला आहे. या भरतीसाठी युवकांना मार्गदर्शन मिळावे, या अनुषंगाने जिल्ह्यात पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर राबवण्याची मागणी आहे. पोलीस भरती प्रशिक्षणात परीक्षेची तयारी, शारीरिक क्षमता चाचणी याबाबतची कशी तयारी करावी, याबाबत मार्गदर्शन मिळत असल्याने भरतीसाठी युवकांना मदत मिळते. त्यामुळे प्रशिक्षण राबवावे, अशी मागणी होत आहे.
पासबुक प्रिंटिंग मशीन दुरुस्त करा
कोरपना : तालुक्यातील वनसडी येथील बँक ऑफ इंडिया शाखेतील पासबुक प्रिंटिंग मशीन नादुरस्त आहे. ती त्वरित दुरुस्त करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. पासबुक प्रिंटिंग मशीन नादुरस्त असल्याने नागरिकांचे पासबुक प्रिंटिंगचे काम रखडले आहे. बँक व्यवस्थापनाने दुरुस्ती लवकरात लवकर करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सावलहिरा -येलापूर मार्ग रखडलेलाच
कोरपना : जिवती तालुका व तेलंगणा राज्याला जोडणारा सावलहिरा ते येलापूर मार्ग अद्यापही रखडलेलाच आहे. परिणामी नागरिकांना दगड धोंड्यातून पायी चालत जावे लागते आहे. याकडे लोकप्रतिनिधी व बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
रेल्वे मार्गाची कामे प्रलंबित
चंद्रपूर : जिल्ह्यातील गडचांदूर ते आदिलाबाद, वरोरा ते उमरेड, मूल-गडचिरोली, बल्लारपूर-सिरोंचा रेल्वे मार्ग तयार करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. रेल्वे मार्ग झाल्यास नागरिकांना दळणवळणाची सोय होणार आहे.
रस्त्यावर पुन्हा लागल्या हातगाड्या
चंद्रपूर : लाॅकडाऊनमुळे सर्व व्यवसाय बंद होते. त्यामुळे मुख्य रस्त्यावर हातठेले गायब झाले होते. परिणामी शहरातील रस्ते रुंद व मोठे दिसत होते. मात्र आता लॉकडाऊन उघडल्याने सर्व सुरळीत झाले. अनेकांनी पुन्हा रस्त्यावर अतिक्रमण करुन हातठेले मांडले आहेत. त्यामुळे रहदारीस अडचण निर्माण झाली आहे.