ज्युबिली हायस्कुल नुतनीकरण कामाच्या निविदा आठ दिवसात प्रकाशित कराव्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:26 AM2021-03-21T04:26:54+5:302021-03-21T04:26:54+5:30
चंद्रपूर : ज्युबिली हायस्कूल चंद्रपूरचे नुतनीकरण, वीर बाबुराव शेडमाके इनडोअर स्टेडियमचे बांधकाम या विकासकामांच्या निविदा येत्या आठ दिवसात प्रसिध्द ...
चंद्रपूर : ज्युबिली हायस्कूल चंद्रपूरचे नुतनीकरण, वीर बाबुराव शेडमाके इनडोअर स्टेडियमचे बांधकाम या विकासकामांच्या निविदा येत्या आठ दिवसात प्रसिध्द करुन अंतिम करण्याच्या सूचना विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या अधिक्षक अभियंत्यांना दिल्या.
महाकाली मंदिर परिसराच्या विकासासंदर्भात पुरातत्व विभागाच्या परवानगीसाठी येत्या १५ दिवसात नवी दिल्लीत केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्र्यांसह बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल, असेही आ. सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले. माझ्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात मंजूर ही विकासकामे माझ्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण व जिव्हाळयाची आहेत, ती आपण पूर्णत्वास नेणारच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.मंजूर विकासकामांचा आढावा घेण्याच्या दृष्टीने आ. सुधीर मुनगंटीवार यांनी अधिक्षक अभियंता सुषमा सारखरवाडे यांच्यासह बैठक घेतली.
श्री महाकाली मंदिर देवस्थान परिसराच्या सौंदर्यीकरणासाठी अंदाजे ६० कोटी रु. निधी १९ सप्टेबर २०१९ रोजी मंजूर झाला असून स्थापत्य अंदाजपत्रकास तांत्रिक मान्यता प्राप्त आहे. पुरातत्व विभागाच्या परवानगीसाठी प्रस्ताव फेर सादर करण्यात आला असल्याची माहिती अधिक्षक अभियंता यांनी दिली.
ज्युबिली हायस्कुलचे नुतनीकरण व वीर बाबुराव शेडमाके स्टेडियम तयार करणे या विकासकामांसाठी निविदा प्रकाशनाची कार्यवाही सुरु असल्याचेही अधिक्षक अभियंता यांनी सांगितले.