वाघाच्या हल्ल्यातून बचावलेला विकास २४ तासांनी सापडला; पत्नीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2022 03:48 PM2022-05-26T15:48:11+5:302022-05-26T15:57:32+5:30
जंगलात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या पती-पत्नीवर वाघाने हल्ला केला. यात पत्नी ठार झाली परंतु, पती हल्ल्यानंतर आढळून आला नाही. तब्बल २४ तासांच्या शोधानंतर बुधवारी सकाळी तो जंगलात बेशुद्धावस्थेत आढळून आला.
चिमूर (चंद्रपूर) :वाघाच्या हल्ल्यातून बचावलेला विकास जांभूळकर बुधवारी सकाळी ९.३० वाजता जंगलातील टेकडीवरील मंदिराजवळ जखमी आणि बेशुद्धावस्थेत आढळून आला. गोंदेडा बिटातील कक्ष क्रमांक ३४ येथील जंगलात तेंदूपाने तोडण्यासाठी जांभूळकर दाम्पत्य गेले असता मंगळवारी सकाळी वाघाने केलेल्या हल्ल्यात त्याची पत्नी मीना ही ठार झाली. चिमूर तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या केवाडा (पेठ) येथील या दाम्पत्यावर वाघाने झडप घातल्याने तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या मजुरांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
विकासच्या शरीरावर, डोक्यावर जखमा असल्याने उपचारासाठी त्याला आधी चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने नंतर नागपूरला हलविण्यात आले आहे, तर याचदरम्यान जखमी विकासचे नायब तहसीलदारांच्या समक्ष बयाण घेण्यात आले.
वनविभागाच्या अधिकाऱ्याचा जावईशोध
तेंदूपाने तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या दाम्पत्यावर वाघाने हल्ला केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. त्यात पत्नीचा मृतदेह आढळून आला. मात्र, पती घटनास्थळापासून बेपता होता. वाघाच्या हल्ल्यात मीना जांभूळकरचा मृत्यू झाल्याचे मान्य करून वनविभागाने कारवाई करून मृतक परिवाराला तातडीची मदत म्हणून २५ हजार रुपयांची मदत दिली. त्यानंतर बेपत्ता असलेला पती विकास तब्बल २४ तासांच्या शोधानंतर बुधवारी सकाळी जंगलात बेशुद्धावस्थेत आढळून आला. त्यामुळे वनविभागाने मंगळवारचा आपला निर्णय फिरवून वाघाच्या घटनेवरच संशय व्यक्त करीत हा मृत्यू वाघाच्या हल्ल्याचा नसल्याचा नवा जावईशोध २४ तासांच्या आत काढला. त्यानंतर मीना जांभूळकरच्या मृतदेहाचे पुन्हा शवविच्छेदनही करण्यात येणार आहे.