तेंदूपत्ता मजुरांना दोन वर्षांपासून बोनसपासून डावलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:25 AM2021-04-05T04:25:26+5:302021-04-05T04:25:26+5:30
तोहोगाव : मध्य चांदा वनविभागाअंतर्गत येणाऱ्या सर्वच वनपरिक्षेत्रात मागील दोन वर्षापासून तेंदूपत्ता मजुरांना बोनस मिळाला नसल्याने मजुरांमध्ये तीव्र संताप ...
तोहोगाव :
मध्य चांदा वनविभागाअंतर्गत येणाऱ्या सर्वच वनपरिक्षेत्रात मागील दोन वर्षापासून तेंदूपत्ता मजुरांना बोनस मिळाला नसल्याने मजुरांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दरवर्षी तेंदूपत्ता युनिटचा लिलाव होत असतो. विडी कंपनी लिलाव घेत असतात. ते ठेकेदार तेंदूपत्ता मजुरांकडून तेंदूपुडे खरेदी करून फळीवर सुकवून त्यापासून विडी बनवून ते नफा कमवित असतात. त्या नफ्यातील रक्कम मजुराला बोनस म्हणून वनविभागामार्फत वाटप केली जाते. परंतु ४ मे २०२० ला शासनाने जीआर नुसार तो निधी वाटप करायच्या आधी शासनाची लिखित परवानगी घ्यावी लागेल, असे कळविण्यात आल्याने मागील दोन वर्षापासून बोनस वाटप झाले नाही.
२०१९ सालातील बोनस वनपरिक्षेत्र निहाय असे आहे. पोंभुर्णा वनपरिक्षेत्र सात लाख ५७ हजार ५७ रुपये, कोठारी १९ लाख ४५ हजार ३४७, धाबा २७ लाख ६४ हजार २६८, राजुरा २९ लाख ८१ हजार ६८२, विरुर दोन लाख १३ हजार २९०, वनसडी ८० हजार ७७१, बल्लारपूर ४ लाख २ हजार ७६० रुपये असा एकूण बोनस शासनदरबारी पडून आहे, तर २०२० वर्षातील आकडेवारी मिळू शकली नाही. दोन वर्षापासून तेंदू मजुरांना बोनस वाटप झालेले नसल्याने मजुरांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. तत्काळ बोनस देण्याची मागणी कारण्यात येत आहे.
कोट
तेंदू बोनसचे पैसे पर्सनल लेजर अकाऊंटमध्ये जमा आहेत. जिल्हा कोषागारकडून मंजुरी घेऊन निधी खर्च करावा लागतो. आम्ही मंजुरीसाठी आग्रही असल्याने लवकरच मंजुरी मिळेल व बोनसचे वाटप करण्यात येईल - अरविंद मुंढे, उपवनसंरक्षक मध्य चांदा चंद्रपूर.