तेंदुपत्ता मजुरांना 2019 चा थकित बोनस अखेर मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2021 05:00 AM2021-10-17T05:00:00+5:302021-10-17T05:00:29+5:30
राजुरा तालुक्यात तेंदुपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांना सन २०१९, २०२० आणि २०२१ या तीन वर्षांतील थकित बोनस त्वरित प्रदान करण्यात यावा, वन्यप्राण्यांपासून शेत पिकाचे होणारे नुकसान थांबविण्यात यावे, याकरिता कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात आणि वन्यप्राण्यांपासून झालेल्या नुकसानग्रस्त शेताचे पंचनामे करून त्वरित नुकसानभरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी, या मागणीसाठी तेंदुपत्ता मजूर संघटनेच्या माध्यमातून उपविभागीय अधिकारी कार्यालय राजुरा येथे नुकतेच एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : तेंदुपाने संकलन करणाऱ्या मजुरांना त्वरित बोनस देण्यात यावा, या प्रमुख मागणीसह अन्य काही मागण्यांच्या पूर्ततेसाठी ॲड. मारोती कुरवटकर यांच्या नेतृत्वात तेंदुपत्ता मजूर संघटनेच्या झालेल्या आंदोलनाला यश मिळाले आहे. सन २०१९ चा बोनस मजुरांना शासनाने नुकताच मंजूर केलेला आहे. यामुळे दिवाळीपूर्वीच मजुरांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
राजुरा तालुक्यात तेंदुपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांना सन २०१९, २०२० आणि २०२१ या तीन वर्षांतील थकित बोनस त्वरित प्रदान करण्यात यावा, वन्यप्राण्यांपासून शेत पिकाचे होणारे नुकसान थांबविण्यात यावे, याकरिता कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात आणि वन्यप्राण्यांपासून झालेल्या नुकसानग्रस्त शेताचे पंचनामे करून त्वरित नुकसानभरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी, या मागणीसाठी तेंदुपत्ता मजूर संघटनेच्या माध्यमातून उपविभागीय अधिकारी कार्यालय राजुरा येथे नुकतेच एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री तसेच राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांना निवेदनसुद्धा पाठविण्यात आले होते. शासनाने या आंदोलनाची दखल घेत तेंदुपत्ता मजुरांची मागणी मान्य केली असून, सन २०१९चा बोनस प्रदान करण्यात शासनाने मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे तेंदुपत्ता मजुरांमध्ये आनंद आहे.
२०२०, २०२१ मधील बोनसचे काय?
शासनाने अद्यापही २०२० आणि २०२१ या वर्षातील थकित बोनस देण्यास मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे येत्या काळात या दोन वर्षांतील थकित बोनसकरिता पुन्हा आंदोलन करण्याचे आवाहन संघटनेच्या माध्यमातून अँड. मारोती कुरवटकर यांनी तालुक्यातील संपूर्ण तेंदुपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांना केलेले आहे. यावेळी अँड. मारोती कुरवटकर, उपसरपंच विकास देवाडकर, माजी सरपंच लहुजी चहारे व नागरिक उपस्थित होते.