नझूलची घरे तोडण्यावरून तुकूममध्ये तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:32 AM2021-09-23T04:32:06+5:302021-09-23T04:32:06+5:30

चंद्रपूर : नझूलच्या जागेवरील घरे पाडण्यासाठी बुधवारी महापालिकेचे पथक तुकूम परिसरात आले. मात्र, नागरिकांनी विरोध केल्याने काही वेळ तणावाची ...

Tensions in Tukum over Nazul's house demolition | नझूलची घरे तोडण्यावरून तुकूममध्ये तणाव

नझूलची घरे तोडण्यावरून तुकूममध्ये तणाव

Next

चंद्रपूर : नझूलच्या जागेवरील घरे पाडण्यासाठी बुधवारी महापालिकेचे पथक तुकूम परिसरात आले. मात्र, नागरिकांनी विरोध केल्याने काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली. अखेर पथकाला परत जावे लागले.

शहरातील तुकूम प्रभाग ही जुनी वस्ती आहे. मागील सुमारे ४० वर्षांपासून येथे नागरिकांचे वास्तव्य आहे. प्रभागातील काहींनी नझूलच्या जागेवर घरे बांधून ते आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. या परिसरात एक शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेकडे जाण्यासाठी रस्ता तयार करण्याच्या उद्देशातून संबंधित संस्था चालकांनी उच्च न्यायालयात नझूलच्या जमिनीवर अतिक्रमण करून बांधण्यात आलेली घरे पाडण्याची परवानगी देण्यासंदर्भात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने संस्था चालकाच्या बाजूने निकाल देत अतिक्रमण करण्यात आलेली चार घरे पाडण्याचे निर्देश दिले. त्यानुसार महानगरपालिकेचे पथक बुधवारी तुकूम परिसरातील अतिक्रमित घरे पाडण्यासाठी पोहोचले. याची माहिती होताच परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन या प्रकाराला विरोध केला. काही काळ रस्ता रोखून धरला. भाजपचे नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, जिल्हा काँग्रेसचे चंद्रपूर शहर अध्यक्ष रामू तिवारी यांनीही घटनास्थळी येऊन, हा येथील नागरिकांवर अन्याय असल्याचे सांगितले.

कोट

या परिसरात अनेक जणांची घरे नझूलच्या जागेवर आहेत. मागील ४० वर्षांपासून ते येथे वास्तव्यास आहेत. टॅक्स, वीज बिल ते देतात. नळ कनेक्शन सर्वांना देण्यात आले आहे. नागरिकांचे कोणतेही म्हणणे ऐकून न घेता ऐन पावसाळ्याच्या दिवसांत घरे पाडणे चुकीचे आहे.

- रामू तिवारी,

शहर अध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटी, चंद्रपूर.

कोट

मागील ४० वर्षांपासून येथे नागरिक वास्तव्यास आहेत. मात्र बुधवारी सकाळी महापालिकेचे पथक नागरिकांची घरे पाडण्यासाठी आल्यानंतर प्रचंड विरोध करण्यात आला. या प्रकाराबाबत रहिवासी नागरिकांना कल्पनाही देण्यात आली नाही. याबाबत कुणावरही अन्याय होणार नाही, यासाठी आपण प्रयत्न करू.

- सुभाष कासनगोट्टूवार, नगरसेवक, चंद्रपूर.

Web Title: Tensions in Tukum over Nazul's house demolition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.