दहाव्या दिवशी ११२ उमेदवार अपात्र
By admin | Published: April 4, 2017 12:45 AM2017-04-04T00:45:06+5:302017-04-04T00:45:06+5:30
येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर गेल्या १५ दिवसांपासून भरती प्रक्रिया सुरू आहे. सध्या शारीरिक मोजमाप व इतर प्रक्रिया सुरू असून....
पोलीस भरती : ६१७ उमेदवार ठरले पात्र
चंद्रपूर : येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर गेल्या १५ दिवसांपासून भरती प्रक्रिया सुरू आहे. सध्या शारीरिक मोजमाप व इतर प्रक्रिया सुरू असून दररोज १ हजार उमेदवारांना बोलाविले जात आहे. भरती प्रक्रियेच्या दहाव्या दिवशी एक हजार उमेदवारांमधून शारीरिक चाचणीत ६१७ उमेदवार पात्र तर ११२ उमेदवार अपात्र ठरले.
जिल्हा पोलीस दलाच्या ७२ पोलीस शिपाई पदाकरिता भरती प्रक्रियेची सुरुवात २२ मार्चपासून पोलीस मुख्यालयातून करण्यात आली. ७२ जागांकरिता एकूण १५ हजार ९६२ उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. यापैकी ३ हजार ४२२ महिला उमेदवार तर १२ हजार ५४० पुरुष उमेदवारांचा समावेश होता. आधी शारीरिक मोजमाप त्यानंतर मैदानी चाचणी आणि शेवटी लेखी चाचणी असे या भरती प्रक्रियेचे स्वरुप आहे.
पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात पार पडत असलेल्या भरती प्रक्रियेचा बंदोबस्त प्रभारी अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत करीत आहेत. यानुसार शारीरिक मोजमाप प्रक्रियेत दर दिवशी एक हजार उमेदवारांना पाचारण करण्यात येत आहे. त्यानुसार दहाव्या दिवशी एकूण उमेदवारांपैकी ६१७ पात्र तर ११२ उमेदवार अपात्र ठरले. यापैकी एकूण निवड करण्यात आलेल्या उमेदवाराची अंतीम यादी घोषित करण्यात येणार आहे. यामध्ये १:१५ या गुणोत्तरानुसार यादी जाहीर करण्यात येणार असून यामध्ये नाव असलेले उमेदवार अंतिम टप्प्यातील लिखित परीक्षेकरिता पात्र असणार आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)