दहावीचा निकाल 99.10 टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 05:00 AM2021-07-17T05:00:00+5:302021-07-17T05:00:30+5:30

कोरोना महामारीने गेल्या शैक्षणिक सत्रापासून विद्यार्थ्यांचे नुकसान झाले होते. यंदाच्या सत्रात तरी परीक्षा होतील, असे वाटत असतानाच कोरोनाची दुसरी लाट आली आणि शाळांना पुन्हा कुलूप लागले. त्यामुळे प्रचलित परीक्षा पद्धतीला टाळून अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दहावीच्या विद्यार्थ्यांना पुढील ११ व्या वर्गात वर्गोन्नती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या निकालासाठी अनेकांची अडचण झाली.

Tenth result 99.10 percent | दहावीचा निकाल 99.10 टक्के

दहावीचा निकाल 99.10 टक्के

Next
ठळक मुद्देफक्त २७० विद्यार्थीच नापास : संकेतस्थळ बंद झाल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना संकटामुळे राज्य माध्यमिक व उच माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा परीक्षा न घेता अंतर्गत मूल्यमापन करून शुक्रवारी दुपारी १ वाजता इयत्ता दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर केला. मात्र, शिक्षण मंडळाचे संकेतस्थळ अचानक बंद झाल्याने हजारो विद्यार्थ्यांना निकाल पाहता आला नाही. विशेष म्हणजे, परीक्षाविना जाहीर झालेल्या या निकालाने विद्यार्थ्यांची ना धडपड वाढविली ना धावपळ दिसून आली, असे एकंदर जिल्ह्यातील चित्र होते. जिल्ह्याचा निकाल ९९. १० टक्के लागला आहे. ३० हजार १२५ पैकी २९ हजार ८५५ उत्तीर्ण तर केवळ २७० विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील ६१६ शाळांमधून ३० हजार १२५ विद्यार्थ्यांची यंदाच्या दहावीत नोंदणी झाली. त्यापैकी २९ हजार ८४५ विद्यार्थी अंतर्गत मूल्यमापनानुसार उत्तीर्ण झाले तर केवळ २८० विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. 
कोरोना महामारीने गेल्या शैक्षणिक सत्रापासून विद्यार्थ्यांचे नुकसान झाले होते. यंदाच्या सत्रात तरी परीक्षा होतील, असे वाटत असतानाच कोरोनाची दुसरी लाट आली आणि शाळांना पुन्हा कुलूप लागले. त्यामुळे प्रचलित परीक्षा पद्धतीला टाळून अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दहावीच्या विद्यार्थ्यांना पुढील ११ व्या वर्गात वर्गोन्नती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या निकालासाठी अनेकांची अडचण झाली.

परीक्षाच न झाल्याने निरूत्साह
दहावीचा ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी राज्य माध्यमिक व उच माध्यमिक शिक्षण मंडळाने संकेतस्थळ दिले. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे हे संकेतस्थळच उघडले नाही. त्यामुळे शहरी भागातील हजारो विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला. कोरोनामुळे शिक्षण मंडळाने परीक्षाच घेतल्या नाही. ११ वीत प्रवेश देण्याचे आधीच जाहीर झाले होते. परिणामी, ग्रामीण भागात ऑनलाइन निकाल पाहण्याबाबत विद्यार्थ्यांचा निरूत्साह दिसून आला. काहींना प्रयत्न करूनही निकाल पाहता आला नाही. तालुकानिहाय निकाल आणि जिल्ह्यातून सर्वाधिक गुण प्राप्त करून उत्तीर्ण होणारे गुणवंत विद्यार्थी कोण, याची माहिती मिळू शकली नाही. यंदा शाळांनीही प्राविण्यप्राप्त गुणवंतांची माहिती माध्यमांकडे पाठविली नाही.

विद्यार्थ्यांचे असे झाले मूल्यांकन
कोरोनामुळे राज्य माध्यमिक व उच माध्यमिक शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी नवे निकष तयार केले होते. दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापनासाठी ३० गुण, दहावीचे गृहपाठ, तोंडी परीक्षा व प्रात्याक्षिक परीक्षेच्या आधारे अंतर्गत मूल्यमापनाला २० गुण आणि विद्यार्थ्यांच्या ९ वीच्या विषयनिहाय अंतिम निकालानुसार ५० गुण असे निकष निश्चित केले. यानुसारच निकाल जाहीर झाला आहे.

 विभागात चंद्रपूर जिल्हा सहावा
नागपूर विभागात भंडारा, नागपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश होतो. दहावीच्या परिक्षेत गोंदियाचा सर्वाधिक ९९.६१ तर सर्वात कमी चंद्रपूर जिल्ह्याचा ९९.१० टक्के निकाल लागला आहे. जिल्ह्यात नियमित २८ हजार ८२१ पैकी २८ हजार ७१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर एक हजार ३०४ पुर्नपरीक्षार्थ्यांपैकी एक हजार १३७ उत्तीर्ण झाले आहेत.

विद्यार्थी समाधानी नसल्यास पुन्हा परीक्षेची संधी
विद्यार्थ्यांना हा निकाल समाधानकारक वाटला नाही तर कोरोनाची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर प्रचलित पद्धतीनुसार श्रेणीसुधार योजनेतंर्गत यापुढील दोन परीक्षांमध्ये परीक्षेची संधी देण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या निकालाचे नियमन करण्यासाठी शालेयस्तरावर मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची निकाल समिती असेल. या निकालपत्रांच्या अभिलेखांची पडताळणी विभागीय स्तरावर शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून केली जाईल, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्य माध्यमिक व उच माध्यमिक शिक्षण मंडळाने यादृष्टीने दहावीचा ऑनलाईन निकाल विद्यार्थ्यांना पाहता यावा, यासाठी जाहीर केला. याबाबतची माहिती शिक्षण विभाग व शाळांना दिली नाही. तांत्रिक अडचणींमुळे संकेतस्थळ बंद झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता आला नाही, हे खरे आहे. मात्र, काही दिवसांतच निकाल शाळांमध्ये उपलब्ध होणार            आहे.
- उल्हास नरड, 
शिक्षणाधिकारी (माध्य.) जि. प. चंद्रपूर

 

Web Title: Tenth result 99.10 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.