जि.प.अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ सहा महिने वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 10:44 PM2019-06-03T22:44:57+5:302019-06-03T22:45:16+5:30
राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे अध्यक्ष तसेच विविध विषय समित्यांचे सभापती आणि पंचायत समित्यांचे सभापती व उपसभापती यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ येत्या २० सप्टेंबर २०१९ रोजी संपुष्टात येणार आहे. राज्यातील दृष्काळी परिस्थिती, पाणी टंचाई व त्याअनुषंगाने करावयाच्या उपाययोजना लक्षात घेता सदर पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ सहा महिने वाढविण्याची मागणी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात राज्यातील जि.प. अध्यक्ष व सभापतींच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे अध्यक्ष तसेच विविध विषय समित्यांचे सभापती आणि पंचायत समित्यांचे सभापती व उपसभापती यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ येत्या २० सप्टेंबर २०१९ रोजी संपुष्टात येणार आहे. राज्यातील दृष्काळी परिस्थिती, पाणी टंचाई व त्याअनुषंगाने करावयाच्या उपाययोजना लक्षात घेता सदर पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ सहा महिने वाढविण्याची मागणी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात राज्यातील जि.प. अध्यक्ष व सभापतींच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. सदर मागणी तत्वत: मान्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या समवेत सदर शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत मागणीचे निवेदन सादर केले. या मागणी विषयीची भूमिका जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे विषद केली. मुख्यमंत्र्यांनी ही मागणी तत्वत: मान्य करत लवकरच आदेश निर्गमित करु असे आश्वासन दिले. शिष्टमंडळात वर्धा जि. प. अध्यक्ष नितीन मडावी, नागपूर जि. प. अध्यक्ष निशा सावरकर, गडचिरोली जि. प. अध्यक्ष संगिता भांडेकर, जळगांव जि. प. अध्यक्षा उज्ज्वला पाटील, औरंगाबाद जि. प. अध्यक्षा देवयानी डोणगांवकर आदींची उपस्थिती होती.