100 कंत्राटी एसटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2021 05:00 AM2021-11-27T05:00:00+5:302021-11-27T05:00:38+5:30
प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेच्या आत वेतन देण्याचे आश्वासनही परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिले. त्यामुळे कर्मचारी संप मागे घेतील, अशी अपेक्षा होती. परंतु, चंद्रपूर जिल्ह्यातील एसटी महामंडळाचे कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. कर्मचारी रुजू झाले नसल्याने शुक्रवारी एकही एसटी डेपोच्या बाहेर निघू शकली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : एसटी महामंडळाला शासकीय विलीनीकरणाच्या मागणीसाठी मागील २६ दिवसांपासून पुकारलेल्या राज्यव्यापी संपात सहभाग घेणाऱ्या चंद्रपूर, वरोरा, राजुरा व चिमूर आगारातील तब्बल कंत्राटी १०० कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तीचा आदेश देण्यात आला. शिवाय, ४१ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केल्याने संपकरीएसटी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. दरम्यान, शुक्रवारी दिवसभर संप सुरूच होता.
बुधवारी परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीची आणि भत्ता वाढविण्याची घोषणा केली होती. मात्र, एसटी महामंडळाचे कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. शुक्रवारी जिल्ह्यातील चार आगारातील एकही कर्मचारी कर्तव्यावर रुजू न झाल्याने एसटीची चाके थांबली आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर, चिमूर, वरोरा, राजुरा हे चार आगार आहेत. या चारही आगारातील सर्व कर्मचारी एसटीचे शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी राज्यव्यापी संपात सहभागी झाले आहेत. परिणामी, सर्वच मार्गांवरील बसफेऱ्या बंदच असून प्रवाशांची मोठी अडचण होत आहे. परिवहन मंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीची घोषणा केली होती. त्यामध्ये एक ते दहा वर्षे नोकरी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात पाच हजार, ११ ते २० वर्षे नोकरी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात चार हजार, २१ ते पुढे नोकरी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात तीन हजार ५०० रुपये तसेच शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई व घरभाडे भत्ता वाढविण्यात येणार आहे. शिवाय, प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेच्या आत वेतन देण्याचे आश्वासनही परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिले. त्यामुळे कर्मचारी संप मागे घेतील, अशी अपेक्षा होती. परंतु, चंद्रपूर जिल्ह्यातील एसटी महामंडळाचे कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. कर्मचारी रुजू झाले नसल्याने शुक्रवारी एकही एसटी डेपोच्या बाहेर निघू शकली नाही.
महामंडळाची सेवा ठप्प
जिल्हास्तरावर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महामंडळाची सेवा ठप्प आहे. अशात खासगी शिवशाही बसगाड्या काही प्रमाणात प्रवाशांसाठी आधार ठरत आहेत. मात्र, त्यातही प्रवासी भाडे अधिक असल्याने नागरिक त्रस्त झाले. दरम्यान, सेवा समाप्ती व निलंबनाची कारवाई केल्याने प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांवर दबावतंत्राचा वापर केला जात आहे, असा आरोप एसटी कर्मचारी संघटनांनी केला आहे.