चंद्रपूर येथे थाटात उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2016 01:01 AM2016-11-11T01:01:00+5:302016-11-11T01:01:00+5:30
पोलीस मुख्यालय येथे मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या नागपूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा २०१६ चे आज रोजी
फुगे सोडले आकाशात : नागपूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा
चंद्रपूर : पोलीस मुख्यालय येथे मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या नागपूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा २०१६ चे आज रोजी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पोलीस मुख्यालयात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम उपस्थित होते.
विशेष पोलीस महानिरीक्षक कदम यांचे हस्ते क्रीडा ज्योत प्रज्ज्वलित करून व उद्घाटन सोहळ्याचा शुभसंदेश म्हणून आकाशात फुगे उडवित क्रीडा स्पर्धेचे थाटात उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुण्यांना पोलीस खेळाडूद्वारे मानवंदना देण्यात आली. त्यानंतर खेळाडूचे पथसंचलन व शपथ विधी पार पडला.
प्रास्ताविक जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी केले. त्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक कदम यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. पुढे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेकरिता शुभेच्छा देऊन नागपूर परिक्षेत्राचे नाव सर्व क्रीडा प्रकारामध्ये महाराष्ट्र पोलीस दलात अव्वल राहील, अशी खेळाडूंकडून अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी देवेंदर सिंह, अपर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत, गडचिरोली अपर पोलीस अधीक्षक मधु शिंगे, आय.ए.एस. अधिकारी अमन मित्तल, चंद्रपूर जिल्ह्याचे सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, जि.प. सभापती देवराव भोंगळे, ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश सोलापन, जिल्हा शांतता समितीचे सदस्य आदी उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर उद्घाटनपर सामन्यांमध्ये २०० मीटर धावण्याची (पुरूष व महिला) स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये पुरूषांमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील लाला कोटनाके यांनी व महिलांमध्ये वर्धा जिल्ह्यातील सुनैना डोंगरे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. यावेळी पोलीस अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)