विहीरगावच्या वादग्रस्त जमिनीचा ठाणेदारांनी लावला निवाडा
By admin | Published: December 8, 2015 12:51 AM2015-12-08T00:51:03+5:302015-12-08T00:51:03+5:30
विरुर पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या विहिरगाव येथील बौद्ध समाजाच्या ताब्यात असलेल्या वादग्रस्त ...
बौद्ध समाज बांधवात आनंद : ३० वर्षांपासून सुरू होता वाद
विरुर (स्टे.): विरुर पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या विहिरगाव येथील बौद्ध समाजाच्या ताब्यात असलेल्या वादग्रस्त जमिनीचा वाद ठाणेदारांच्या मध्यस्थीने मिटला आहे. महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून विरुरचे ठाणेदार यांनी सदर जमिनीचा निवाडा लावल्याने बौद्ध समाज बांधवामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे ठाणेदाराचे कौतुक होत आहे.
विरुर पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या विहीरगाव येथील ३० वर्षापूर्वी अजय डंभारे यांच्या आईने बसस्थानकाला लागून असलेली साडे तीन गुंटे जमीन बौद्ध समाज मंडळांला विक्री केली. तेव्हा पासून या जागेवर बौद्ध बांधव धार्मिक कार्यक्रम पार पाडत होते. त्यावेळेस बौद्ध समाज बांधवांनी रितसर विक्रीपत्र करुन घेतले नाही. मात्र ठरविल्याप्रमाणे जागेची अर्धी रक्कम घेऊन इसार पत्र केले. मात्र पूर्ण पैसे देऊन विक्रीपत्र करुन आपल्या नावावर जमीन करुन न घेतल्यामुळे चार वर्षा अगोदर अजय डंभारे यांनी सदर जागा ही माझ्या मालकीची असल्याचा दावा केला.
त्यामुळे जमिनीचा वाद वाढत गेला. सदर प्रकरण विरुर पोलीस ठाण्यात गेले तसेच न्यायप्रविष्ट होते. सदर जागेचे कोणतेही कागदपत्र बौद्ध समाज मंडळाकडे नसल्याने न्यायालयाने सदर जागा अजय डंभारेच्या मालकीची असल्याचे सांगितले. मात्र बौद्ध बांधवांना धार्मिक कार्यक्रम घेण्यासाठी दुसरी कोणतीही जागा उपलब्ध नसल्याने धार्मिक कार्यक्रम कुठे घ्यायचे, या विवंचनेत होते. तेव्हा विरुर ठाणेदारांनी डंभारे कुटुंबीय आणि बौद्ध बांधवांना जमिनीबाबत चर्चा करण्याचे ठरविले. त्यात परिसरातील विविध गावातील नागरिकांना बोलाविण्यात आले. त्यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून चर्चा करण्यात आली.
चर्चासत्रात उपस्थितांनी आपआपली मते मांडली. तेव्हा चर्चेअंती ठाणेदारांनी एकूण जमिनीपैकी अर्धी जमीन समाजाला दान करा, अशी विनंती केली. तेव्हा डंभारे यांनी त्या जमिनी पैकी दीड गुंटा जमीन समाजाला देण्याचे मान्य केले. अखेर ३० वर्षांपासून असलेल्या वादग्रस्त जमिनीचा ठाणेदारांनी निवाडा लावला. यावेळी जि.प. सदस्य अविनाश जाधव, ठाणेदार श्याम गव्हाणे, सरपंच प्रतिभा करमनकर, उपसरपंच शेख इरशाद, तंटामुक्त समिती अध्यक्ष नीलकंठ खेळेकर, चरणदास नगराळे, अविनाश रामटेके, सचिन पिपरे, बंडू रामटेके, लटारु नारनवरे, पुरुषोत्तम चहारे, गणपत पुणेकर, परशुराम वाघमारे तसेच गावकरी उपस्थित होते. (वार्ताहर)