लोकमत कालदर्शिकेचे थाटात प्रकाशन
By admin | Published: November 29, 2015 01:50 AM2015-11-29T01:50:36+5:302015-11-29T01:50:36+5:30
सर्वांना हवाहवासा वाटणारा आणि वाचकवर्ग ज्याची आतुरतेने वाट बघत असतो, त्या लोकमत कालदर्शिकाचे प्रकाशन येथील लोकमतच्या जिल्हा कार्यालयात आज शनिवारी दुपारी थाटात झाले.
चंद्रपूर : सर्वांना हवाहवासा वाटणारा आणि वाचकवर्ग ज्याची आतुरतेने वाट बघत असतो, त्या लोकमत कालदर्शिकाचे प्रकाशन येथील लोकमतच्या जिल्हा कार्यालयात आज शनिवारी दुपारी थाटात झाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमतचे ज्येष्ठ सदस्य डॉ. अशोक बोथरा होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिध्द ज्योतिष्याचार्य तथा ग्रहांकित जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी गोविंदराव राजकोंडावार, मंदाश्री पुरस्काराच्या मानकरी ज्योतिष्याचार्य मेघा राजकोंडावार, यंग इंडिया बुकस्टॉलचे संचालक मोहम्मद फारुख, बजाज कॅपिटलचे ब्रँच हेड मनीष यादव, लोकमतचे वितरक जितेंद्र चोरडिया, रमण बोथरा, लोकमत नागपूरचे जिल्हा प्रतिनिधी (ग्रामीण) गणेश खवसे, लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी गोपालकृष्ण मांडवकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना गोपालकृष्ण मांडवकर यांनी लोकमत कालदर्शिकेचा प्रवास व परंपरेवर प्रकाश टाकला. त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते कालदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी ज्योतिषाचार्य राजकोंडावार म्हणाले, लोकमत कालदर्शिका हे केवळ एक कॅलेंडर नसून ते एक पंचांगच आहे. पूर्वी पंचांग घटीवर आधारित लिहिले जायचे. त्यामुळे सर्वसामान्यांना ते समजणे कठीण होते. आता पंचांग तासावर आधारित लिहिले जाते. त्यामुळे पंचांग पाहणे सोपे झाले आहे. लोकमत कालदर्शिकेतील लेखही वाचनीय असतात. यामुळेच लोकमतची कालदर्शिका अल्पावधीत घराघरात पोहचली, असे ते म्हणाले. याप्रसंगी डॉ. अशोक बोथरा यांच्यासह इतर पाहुण्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन लोकमत सखी मंच जिल्हा संयोजिका पूजा ठाकरे तर आभार संतोष कुंडकर यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)
आठवणींना उजाळा
ज्योतिष्याचार्य गोविंदराव राजकोंडावार यांनी कार्यक्रमात बाबूजींशी असलेल्या स्रेहबंधाच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, लोकमतच्या स्थापनेपासून तर २००३ पर्यंत लोकमतमध्ये आपण अखंडपणे दैनिक व साप्ताहिक राशिभविष्य लिहिले. बाबूजींच्या आग्रहावरून आपण सातत्याने लिहीत होतो. त्या काळात त्यांच्याशी वाढलेला ऋणानुबंध आजही लोकमतशी कायम असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.