लाच प्रकरणातील आरोपीने घेतली थेट तलावात उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2022 05:00 AM2022-05-01T05:00:00+5:302022-05-01T05:00:38+5:30
लाचखोर दोन्ही पोलिसांना अटक केल्यानंतर ते लाचलुचपत प्रतिबंधक चमूच्या ताब्यात होते. पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांचा खडा पहारा होता. असे असतानासुध्दा राजेश त्रिकोलवार (५२) या आरोपीने लघुशंकेेचा बहाणा करून नगर परिषदेसमोरील तलावात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. शनिवारी रात्री १०.१० वाजता अचानक घडलेल्या या घटनेने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व स्थानिक पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील दोन पोलिसांना ५० हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली. लाचखोर दोन्ही पोलिसांना अटक केल्यानंतर ते लाचलुचपत प्रतिबंधक चमूच्या ताब्यात होते. पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांचा खडा पहारा होता. असे असतानासुध्दा राजेश त्रिकोलवार (५२) या आरोपीने लघुशंकेेचा बहाणा करून नगर परिषदेसमोरील तलावात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. शनिवारी रात्री १०.१० वाजता अचानक घडलेल्या या घटनेने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व स्थानिक पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.
बल्लारपूर येथील एका व्यक्तीच्या तक्रारीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना कार्यालयासमोरील पानटपरीवर सापळा रचून लाच घेताना अटक करण्यात आली. राजेश त्रिकोलवार व सुधांशू मडावी (४५) अशी आरोपींची नावे आहेत.
अटकेनंतर आरोपींना पोलीस स्टेशनमध्ये आणले. कारवाईसंदर्भात प्रक्रिया सुरू असतानाच अचानक लघुशंकेचा बहाणा करून आरोपी राजेश त्रिकोलवार याने पोलिसांनाच गुंगारा देऊन पळ काढला व आत्महत्या करण्यासाठी थेट नगर परिषदसमोरील तलावात उडी घेतली. तब्बल एक तास आरोपी हा पाण्यात होता व त्याला वाचविण्यासाठी काहींनी उड्या घेतल्या. आरोपीला समजाविण्याचा प्रयत्न केला; पण आरोपी बाहेर येण्यास तयार नव्हता. अखेर पोलीस संपत पुलिपाका यांनी त्याला समजावून बाहेर काढण्यात यश आल्याने पोलिसांना सुटकेचा श्वास घेतला.