एसआयडीसीतील बंद कारखान्यावर आता प्रशासनाची नजर; पोलिसांच्या सहकार्याने तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 02:48 PM2023-10-31T14:48:51+5:302023-10-31T14:49:18+5:30

अंमली पदार्थ विरोधी मोहीम होणार अधिक व्यापक

The administration is now looking at the closed factory in SIDC; The unit will be inspected with the help of the police | एसआयडीसीतील बंद कारखान्यावर आता प्रशासनाची नजर; पोलिसांच्या सहकार्याने तपासणी

एसआयडीसीतील बंद कारखान्यावर आता प्रशासनाची नजर; पोलिसांच्या सहकार्याने तपासणी

चंद्रपूर : एमआयडीसीने त्यांच्या क्षेत्रातील बंद पडलेल्या युनिटची माहिती घ्यावी. या युनिटची यादी तयार करून पोलिसांना द्यावी, अन्न व औषध प्रशासन विभागाने एमआयडीसी क्षेत्रातील युनिटला पोलिसांच्या सहकार्याने भेटी द्याव्यात. तसेच जे कारखाने बंद आहेत त्यावर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिले. अमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांचे सेवन अधिक प्रमाणात होऊ शकते. याकरिता शिक्षण विभागाने शाळा व महाविद्यालयांमध्ये अमली पदार्थाचे प्रतिबंध व दुष्परिणामाबाबत जनजागृतीपर उपक्रम राबवावेत. जिल्ह्यात संबंधित यंत्रणांनी अमली पदार्थ विरोधी मोहीम अधिक व्यापक करावी, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय अमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, सहायक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., अपर पोलिस अधीक्षक रीना जनबंधू, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, सहायक पोलिस निरीक्षक चत्तरकर, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त वाने, उपशिक्षणाधिकारी निकिता ठाकरे, डाक निरीक्षक एस. दिवटे, केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाचे विजयकुमार नायर आदी उपस्थित होते.

याकडेही वेधले लक्ष

कृषी तसेच वनविभागाने जिल्ह्यात खसखस किंवा गांजा पिकांची अवैध लागवड होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. डाक विभागाने डार्कनेट व कुरिअरच्या माध्यमातून अमली पदार्थाची मागणी व पुरवठा होणार नाही याकडे लक्ष द्यावे. त्यासोबतच दैनंदिन पार्सलचे नियमित स्कॅनिंग करून तपासणी करावी. ड्रग्स मॅन्युफॅक्चर होऊ नये, याबाबत अन्न व औषध प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

सीसीटीटीव्ही सक्तीची

अंमल पदार्थ विरोधी मोहीम अधिक व्यापक करण्यासाठी प्रत्येक मेडिकल स्टोअर्समध्ये सीसीटीव्ही लावणे सक्तीचे करण्यात आले आहे. सीसीटीव्ही नसल्यास नियमानुसार कार्यवाही होणार आहे.

Web Title: The administration is now looking at the closed factory in SIDC; The unit will be inspected with the help of the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.