बिरसा मुंडाची लढाई आदिवासींसह वंचितांना प्रेरणादायी - डॉ. निलकांत कुलसंगे
By राजेश मडावी | Published: June 11, 2023 07:27 PM2023-06-11T19:27:26+5:302023-06-11T19:27:34+5:30
अवघ्या पंचविशीच्या आत बिरसा मुंडा यांनी ब्रिटिश सत्तेविरूद्ध विद्रोह पुकारला.
चंद्रपूर : अवघ्या पंचविशीच्या आत बिरसा मुंडा यांनी ब्रिटिश सत्तेविरूद्ध विद्रोह पुकारला. बिरसा मुंडाच्या समग्र लढाईचा मतिथार्थ आदिवासींसह देशातील सर्व वंचित समाजासाठी प्रेेरणादायी आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध सामाजिक विचारवंत डॉ. निलकांत कुलसंगे यांनी केले.
प्रब्रह्मानंद मडावी यांच्या ‘क्रांतीयोद्धा जननायक बिरसा मुंडा’ हा मराठी चरित्रग्रंथाचे उलगुलान साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूरद्वारा रविवारी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहातील प्रकाशन सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. मंचावर समाजसेविका डॉ. अभिलाषा बेहरे-गावतुरे, ज्येष्ठ लेखक डाॅ. इसादास भडके, अभ्यासक राजेश मडावी, डॉ. रामचंद्र वासेकर, चित्रकार भारत सलाम, कवी नरेशकुमार बोरीकर, डॉ. राकेश गावतुरे, लेखक प्रब्रह्मानंद मडावी उपस्थित होते.
डॉ. कुलसंगे म्हणाले, आदिवासींच्या न्याय हक्कांआड जे सत्ताधारी आले. त्यांच्याविरूद्ध ते लढत होते. ब्रिटिश आडवे आल्यानंतर त्यांच्याविरूद्धही जीवाची पर्वा न करता लढा दिला. आजही आदिवासी समाज समस्यांच्या गर्तेत आहे. यातून बाहेर पडण्यासाठी मडावी यांनी लिहिलेल्या बिरसा मुंडा क्रांतिकारी लोकनेत्याचा चरित्रग्रंथ प्रेरणादायी ठरणार आहे. डॉ. गावतुरे म्हणाल्या, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ज्यांचे कर्तृत्वच नाही, अशा व्यक्तींचा आज उदोउदो सुरू आहे. पण, आदिवासी बहुजन समाजातील खरे नायक उपेक्षित आहेत. प्रब्रह्मानंद मडावी यांनी संशोधन करून लिहिलेले चरित्रपुस्तक सर्वांनी वाचावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रब्रह्मानंद मडावी यांनी ग्रंथ लेखनाची प्रेरणा विशद केली. प्रास्ताविक भय्याजी उईके, संचालन प्रा. महेश गेडाम, अरविंद मसराम यांनी केले. परमानंद जेंगठे यांनी आभार मानले. आयोजनासाठी भैयाजी उईके, अरविंद मसराम, भोला मडावी, राजू बन्सोड, राजेश संगेल, चिदानंद सीडाम, तेजस मडावी , प्रभा मडावी, यशोदा मडावी, विलास सिडाम, यश मडावी, लक्ष्मण सोयाम आदींनी सहकार्य केले.
बिरसाला फक्त ब्रिटिशविरोधी रंगविणे चुकीचे
समीक्षक डॉ. इसादास भडके म्हणाले, बिरसा मुंडा यांना प्रस्थापित लेखकांनी केवळ ब्रिटिशविरोधी याचदृषटीने रंगविले. पण, बिरसा मुंडाचा लढा व्यापक होता. भारतातील जमिनदार, भांडवलदार व विषमतावादी धर्मसत्तेविरूद्धही बिरसा लढत होते. ही फुले-शाहू, आंबेडकरी विचारांना जोडणारी धारा आहे. प्रब्रह्मानंद मडावी यांनी संशोधनशिस्त पाळून बिरसाचा व्यवस्थाभंजक संघर्ष पुढे आणला. डॉ. रामचंद्र वासेकर यांनीही ग्रंथाची शक्तीस्थळे नोंदविली. राजेश मडावी, कवी नरेशकुमार बोरीकर, डॉ. राकेश गावतुरे यांनी मडावींच्या ग्रंथाची प्रासंगिकता अधोरेखित केली.