बुडालेल्या भावाला वाचविणाऱ्या बहिणीचा अखेर मृतदेह गवसला; सावली तालुक्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2022 04:27 PM2022-08-29T16:27:57+5:302022-08-29T17:33:20+5:30
गोसेखुर्द कालव्यात जलसमाधी
सावली (चंद्रपूर) : सावली येथील गोसेखुर्द प्रकल्पाच्या कालव्यामध्ये आपल्या लहान भावाला वाचविण्याच्या प्रयत्नात काजल अंकुश मक्केवार (वय १३) ही शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास वाहून गेली होती. २४ तासांपेक्षा अधिक कालावधीनंतर तालुक्यातील सिंगापूरपासून अर्धा किमी अंतरावर काजलचा मृतदेह शनिवारी (दि. २७) दुपारी १२.३० च्या सुमारास आढळून आला.
तालुक्यातील गोसेखुर्द कालव्याजवळच्या वसाहतीतील महिला कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्या मागून काजल, तिची बहीण सुष्मिता (१५) व भाऊ राहुल मक्केवार(१०) आणि त्याचे मित्र रोहित (१३), अनुराग (११) हेसुद्धा नहरावर गेले होते. कालव्याच्या पायरीवर असताना राहुलचा तोल जाऊन तो पाण्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी काजल, सुष्मिता व मित्रांनी कालव्यात उडी टाकली; परंतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने हे सर्वच वाहत जाऊ लागले.
दरम्यान, महिलांनी आरडाओरड करून जवळपास असणाऱ्या नागरिकांना बोलावले असता संतोष राऊत व विशाल दुधे यांनी पाण्यात उडी घेऊन चार मुलांना कालव्यातून बाहेर काढले. मात्र काजल दिसून आली नाही. पोलीस प्रशासनाने बोटीद्वारे शोधकार्य सुरू करून कालव्याचा ५-६ कि.मी. परिसर पिंजून काढला. शनिवारी सिंगापूर या गावापासून अर्धा कि.मी. अंतरावर काजलचा मृतदेह तरंगताना आढळून आला. पुढील तपास ठाणेदार आशिष बोरकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक चिचघरे, मडावी करीत आहेत.