२० दिवसांवर पोराचं लग्न आलं अन् बँकेतील रक्कमच झाली गहाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2022 07:00 AM2022-04-01T07:00:00+5:302022-04-01T07:00:07+5:30
Chandrapur News चंदनखेडा येथील शेतकऱ्यांच्या दोन मुलांचे २० दिवसांवर लग्न येऊन ठेपले असून, त्यांच्या खात्यात दोन हजार शिल्लक ठेवून १५ लाख गहाळ करण्यात आले आहे.
विनायक येसेकर
चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेतून २६ खातेदारांच्या खात्यातून रक्कम गहाळ झाल्याचा प्रकार घडला. त्यात चंदनखेडा येथील शेतकऱ्यांच्या दोन मुलांचे २० दिवसांवर लग्न येऊन ठेपले असून, त्यांच्या खात्यात दोन हजार शिल्लक ठेवून १५ लाख गहाळ करण्यात आले आहे.
तसेच येथील शेतमजुराने आपल्या मनोरुग्ण मुलाच्या नावाने आरडी काढली. येथीलही रक्कम गहाळ झाली. या प्रकाराने येथील सर्वच खातेदार आता सतर्क झाले आहेत. विदर्भ कोकण ग्रामीण बँक येथे चंदनखेडा येथील शेतकरी दादाजी कोकुडे यांनी लग्नासाठी १५ लाख २८ हजार २०० रुपये जमा केले होते. त्यांच्या दोन मुलांचे लग्न २० एप्रिलला आहे. या लग्नात कसा खर्च करायचा, याचे त्यांनी नियोजन केले होते. ते २७ मार्चला लग्नाच्या खरेदीकरिता रक्कम काढण्यासाठी गेले असता, त्यांच्या खात्यातील १५ लाख २८ हजार २०० रुपयांपैकी केवळ दोन हजार शिल्लक असल्याचे बँकेकडून सांगण्यात आल्याने त्यांना धक्काच बसला. आपली रक्कम गहाळ झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
शेतमजुराची रक्कमही गायब
येथील दत्तुजी मुडेवार हे शेतमजूर आहेत. ते मिळेल तिथे रोजीने काम करतात. त्यांना चरणदास नावाचा गतिमंद मुलगा आहे. त्यांच्या भविष्यासाठी काही तरी करावे, यासाठी त्यांनी तीन वर्षांसाठी आरडी काढली व महिन्याला एक हजार रुपये भरत होते. मार्च महिन्यात तीन वर्षे पूर्ण होणार होते. या बँकेचा प्रकार बघता त्यांनीसुद्धा बँकेत चौकशी केली असता, त्यांच्या खात्यात ३६ हजार जमा व्हायला पाहिजे; परंतु आठ हजार शिल्लक असल्याचे सांगण्यात आले. बँकेतील खातेदारांची एकच गर्दी होत असून, आमची रक्कम खात्यात आहे की नाही, याबाबत खातेदार शहानिशा करत आहे. दररोज पाच ते सहा प्रकरणे समोर येत असल्याने विदर्भ बँकेतून तब्बल करोडो रुपये गहाळ झाल्याची चर्चा गावात आहे.
विदर्भ कोकण ग्रामीण बँकेची रक्कम गहाळ होण्याचा प्रकार दररोज वाढत असून, आतापर्यंत ३० ग्राहकांचे अर्ज माझ्याकडे आले आहे. या प्रकाराबाबत बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासह ठाणेदार तसेच पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. या शेतकरी, शेतमजुरांची रक्कम परत त्यांच्या बँकेच्या खात्यात जमा करण्यात यावी, अन्यथा बँकेच्या विरोधात जनआंदोलन उभारू.
-सुधीर मुडेवार सामाजिक कार्यकर्ते चंदनखेडा.