१५ गावांचा डोलारा एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 16:53 IST2025-03-21T16:53:10+5:302025-03-21T16:53:38+5:30

राजोली प्राथमिक आरोग्य केंद्र : रुग्णांची होतेय गैरसोय

The burden of 15 villages on a single medical officer! | १५ गावांचा डोलारा एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावर !

The burden of 15 villages on a single medical officer!

लोकमत न्यूज नेटवर्क
मूल :
जनतेच्या आरोग्यविषयक समस्या सोडविण्यासाठी मूल तालुक्यातील राजोली प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत निर्माण करण्यात आली. इमारत झाल्यावर रिक्त पदे भरली जातील, असा आशावाद जनतेत होता. मात्र, वर्ष लोटत असताना देखील रिक्त पदांचे ग्रहण सुटता सुटत नसल्याचे चित्र आजही कायम आहे. त्यामुळे १५ गावांचा भार पेलवता पेलवत नसून एकच वैद्यकीय अधिकारी हा भार सांभाळत आहे. त्यामुळे जनतेत नाराजीचा सूर उमटत आहे. यासाठी रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक झाले आहे.


ग्रामीण भागात जनतेला आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत असल्याने त्यांना लांब अंतरावर जाऊन उपचार करणे कठीण असते. यासाठी गावाजवळच उपचार करता यावा, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. मूल तालुक्यातील राजोलीअंतर्गत १५ गावे येत असून, यात राजोली, डोंगरगाव, चिखली, चितेगाव, बेलघाटा, तसेच नवेगाव, लोन खैरी, मुरमाडी, ताडभूज व गोलभूज या जंगलव्याप्त गावांचा समावेश आहे. या गावातून रुग्ण उपचार करण्यासाठी येत असतात. त्यांना योग्य उपचार होण्याच्या दृष्टीने वैद्यकीय यंत्रणा सज्ज आहे. मात्र, आता या यंत्रणेला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे.


परिचारिक, शिपाई, औषधी सहायकही नाही
वैद्यकीय अधिकारी असेल तरी परिचारिका, शिपाई व औषधी सहाय्यक ही पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. औषधी सहायक पद रिक्त असल्याने कुठली औषधी आणायची, याचा ताळमेळ नाही. त्यामुळे रुग्णांना आवश्यक असलेली औषधी मिळत नसल्याचे दिसून येत आहे. परिचारिकेचे पद रिक्त आहे. देखभाल व इतर माहितीसाठी शिपाई पद रिक्तच आहे. त्यामुळे त्याचाही भार एकूण वैद्यकीय प्रशासनावर पडत आहे. त्यामुळे ग्रामीण जनतेला योग्य उपचार करण्यासाठी रिक्त पदांचे ग्रहण हटविण्याची मागणी जनतेनी केली आहे.


"प्राथमिक आरोग्य केंद्र, राजोली येथे यापूर्वी दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत होते. मात्र, त्यांची बदली झाल्याने नव्याने अजिंक्य पेशेट्टीवार रुजू झाले आहेत. ते योग्य उपचार करीत आहेत. मात्र, एका वैद्यकीय अधिकाऱ्यांना अतिरिक्त भार पडत आहे. त्यामुळे तातडीने वैद्यकीय अधिकारी पद भरणे आवश्यक आहे. तसेच रुग्णकल्याण समितीची गेल्या आठ महिन्यांपासून सभा होत नसल्याने वैद्यकीय आरोग्यासंदर्भात समस्या मांडता येत नसून त्वरित तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सभा आयोजित करणे आवश्यक आहे."
- जितेंद्र लोणारे, सरपंच, ग्रामपंचायत राजोली.

Web Title: The burden of 15 villages on a single medical officer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.