बिडिओंचा ताफा घेऊन सीईओ पोहचल्या डोंगळहळदी शाळेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2022 05:00 AM2022-04-20T05:00:00+5:302022-04-20T05:00:43+5:30
विद्यार्थ्यांची गुणवत्ता, शाळा परिसर स्वच्छ, शाळेची दुरुस्ती आदी कामे त्यांनी लोकसहभाग मिळवून मुख्याध्यापक पोटे यांनी अवघ्या काही दिवसात शाळेची प्रगती करून दाखविली. त्यामुळे ही शाळा आता इतरांसाठी माॅडेल म्हणून समोर आली आहे. भेटीप्रसंगी अधिकाऱ्यांसह मुख्याध्यापक पोटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास बोरांडे, सरपंच संगीता कुळमेथे, शिक्षक चिमूरकर यांच्यासह ग्रामस्थांचीही उपस्थिती होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : इंग्रजी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळाही कुठेच कमी नसल्याचे चित्र पोंभूर्णा तालुक्यातील डोंगळहळदी तु, शाळेतील प्रगती बघितल्यानंतर दिसून येते. राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक जे. डी. पोटे यांच्या प्रयत्नातून आणि लोकसहभागातून या शाळेचा कायापालट झाला आहे. या शाळेची प्रगती बघण्यासाठी चक्क मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मिताली सेठी जिल्ह्यातील पंधराही तालुक्यातील संवर्ग विकास अधिकाऱ्यांना घेऊन पोहचल्या. यामुळे तेथील विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना अत्यानंद झाल्याचे मंगळवारी बघायला मिळाले.
विद्यार्थ्यांची गुणवत्ता, शाळा परिसर स्वच्छ, शाळेची दुरुस्ती आदी कामे त्यांनी लोकसहभाग मिळवून मुख्याध्यापक पोटे यांनी अवघ्या काही दिवसात शाळेची प्रगती करून दाखविली. त्यामुळे ही शाळा आता इतरांसाठी माॅडेल म्हणून समोर आली आहे. भेटीप्रसंगी अधिकाऱ्यांसह मुख्याध्यापक पोटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास बोरांडे, सरपंच संगीता कुळमेथे, शिक्षक चिमूरकर यांच्यासह ग्रामस्थांचीही उपस्थिती होती. शाळेच्या विकासात ग्रामस्थांचा सहभाग करून घेत असल्यामुळे प्रत्येक कामात ग्रामस्थ हिरहिरीने सहभाग घेत असल्याची यावेळी दिसून आले. सीईओंना शाळेत आणण्यासाठी बीडीओ धनंजय साळवे यांनी विशेष प्रयत्न केले.
या अधिकाऱ्यांची हजेरी
जिल्हा परिषद शाळा डोंगरहळदी तु. ला भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये
सीईओ मिताली सेठी यांच्यासह उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) कपिलनाथ कलोडे, भद्रावतीचे संवर्ग विकास अधिकारी मंगेश आरेवार, वरोराचे संवर्ग विकास अधिकारी राजेश राठोड, चिमूरच्या संवर्ग विकास अधिकारी प्रणाली कोचरे, ब्रह्मपुरीच्या संवर्ग विकास अधिकारी प्राजक्ता भस्मे, सिंदेवाही संवर्ग विकास अधिकारी संजय पुरी, मूल संवर्ग विकास अधिकारी सुनील कारडवार, सावली येथील संवर्ग विकास अधिकारी सुनीता मरस्कोल्हे, पोंभूर्णा येथील संवर्ग विकास अधिकारी धनंजय साळवे, गोंडपिपरीचे शेषराव बुलकुंडे, राजुराचे किरणकुमार धनवडे, चंद्रपूरचे आशुतोष सपकाळ, जिवतीचे विजय पेंदाम, कोरपना येथील दिलीप बैलनवार आदींची उपस्थिती होती.
पहिल्यांदाच गावात सीईओ
- पोंभूर्णा तालुक्यातील डोंगरहळदी या दुर्गम गावामध्ये आजपर्यंतच्या काळामध्ये एकदाही कोणत्याही सीईओंनी भेट दिली नाही. मात्र, सीईओ मिताली सेठी यांनी मंगळवारी शाळेची पाहणी करण्यासाठी हजेरी लावली. त्यामुळे ग्रामस्थांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
मुख्याध्यापकांचे कौतुक
शाळा परिसर स्वच्छ, बगीचा, निटनेटकेपणा, फूलझाले, विद्यार्थ्यांना आकलन होईल अशी बाला पेंटिंग यासह विद्यार्थ्यांची गुणवत्ता बघून सीईओंनी मुख्याध्यापक राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक जे. डी. पोटे यांचे कौतुक केले.
लोकसहभागातून शाळा परिसर सुशोभित
- जिल्हा परिषद शाळेला शासनाकडून पाहिजे तसा निधी मिळत नाही. त्यामुळे येथील मुख्याध्यापक पोटे यांनी लोकसहभागातून शाळेचे सुशोभिकरण केले. एवढेच नाही तर प्रत्येक कामात नागरिकांचा सहभाग घेतला. त्यामुळे सध्या ही शाळा चकाचक झाली आहे.
विद्यार्थ्यांसोबत हितगूज
शाळेत सीईओ पोहोचल्यानंतर त्यांनी प्रथम विद्यार्थ्यांसोबत हितगूज करीत त्यांना प्रथम बोलते केले. यावेळी विद्यार्थ्यांनीही मनमोकळेपणाने त्यांच्यासोबत संवाद साधला. दरम्यान, पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांनी वाचून दाखविल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केले.