दिल्लीतून लागला सुगावा; वरोरात बनावट हापिंकची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 02:16 PM2024-09-28T14:16:57+5:302024-09-28T14:18:23+5:30

पोलिसांची धाड : मुद्देमाल जप्त करून व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा

The clue came from Delhi; Sale of Fake Harpic in Varora | दिल्लीतून लागला सुगावा; वरोरात बनावट हापिंकची विक्री

The clue came from Delhi; Sale of Fake Harpic in Varora

लोकमत न्यूज नेटवर्क 
वरोरा :
शहरातील अनेक दुकानांत चक्क बनावट हार्पिक आणि लायझोलची विक्री सुरू असल्याचा सुगावा कंपनीच्या दिल्ली येथील कार्यालयास लागला. कंपनीच्या सल्लागाराने वरोऱ्यात येऊन तक्रार दाखल करताच पोलिसांनी गुरुवारी (दि.२६) रात्री दुकानांत धाड टाकली. या धाडीत ४६ हजारांचा बनावट मुद्देमाल जप्त करून तीन दुकानदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आनंद किराणा शॉप, वानखेडे एजन्सी, अतुल प्लास्टिक, अशी दुकानांची नावे आहेत.


मागील दशकभरात वरोरा शहरातील बाजारपेठेचा मोठा विस्तार झाला. ठोक व्यापाऱ्यांची संख्या वाढली. अनेक व्यापारी दिल्ली, मुंबई व नागपूर शहरांतूनही मालाची ठोक खरेदी करू लागले. किराणा कापडपासून ते ट्रेडिंगच्या व्यवसायात कोट्यवधींची उलाढाल होत आहे. मोठ्या महानगरांशी कनेक्टिव्हिटी वाढली. त्यातून नफा मिळविण्याच्या स्पर्धेत काहींनी अवैध मार्गाचाही वापर सुरू केल्याचा आरोप नागरिकांकडून असतो. अशा स्थितीत शहरातील आनंद किराणा शॉप, वानखेडे एजन्सी, अतुल प्लास्टिक या दुकानांत बनावट हार्पिक आणि लायझोल विक्री सुरू असल्याची माहिती व्यापारी वर्तुळात पसरली. ही बाब हार्पिक आणि लायझोल उत्पादन करणाऱ्या दिल्ली येथील कंपनीपर्यंत पोहोचली. त्यामुळे कंपनीच्या सल्लागाराने दिल्लीतून थेट वरोरा गाठले. गुरुवारी रात्री याबाबत तक्रार दाखल केली. रात्री तीन दुकानांवर छापा टाकण्यात आला. यामध्ये ४६ हजार रुपये किमतीचे बनावट हार्पिक आणि लायझोल आढळून आले. पोलिसांनी दुकानदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम ६३, ६५ कॉपीराइट व ३१८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कारवाई पोलिस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांच्या नेतृत्वात विनोद जांभळे, भस्मे, मोहन निषाद दुधे, दिलीप सूर, मनोज ठाकरे आदींनी कारवाई केली. 


बड्या व्यापाऱ्यांचे नेटवर्क 
हार्पिक बनविण्यासाठी हायड्रोक्लोरिक अॅसिड, हायड्रॉक्सिथिल ओलेमाइन, अमोनियम क्लोराइड, मिथाइल सॅलिसिलेट, ब्यूटिलेटेड हायड्रॉक्सिटोल्युइन, अॅसिड ब्लू २५, अॅसिड लाल ८८, डीआयोनाइज्ड व पाणी यासारख्या घटकांचा वापर केला जातो, अशी जाणकारांची माहिती आहे. मात्र, जप्त केलेल्या हार्पिकमध्ये या घटकांची कमतरता आहे. शिवाय, एका कंपनीच्या नावावर बनावट वस्तू विकल्याचा प्रकार घडला. त्यामुळे यामागे बड्या व्यापाऱ्यांचे नेटवर्क असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


ठोक पुरवठादार नेमका कोण? 
वरोरा शहरात आढळलेली हार्पिक आणि लायझोल जिल्ह्यातील अनेक दुकानांत साठवून ठेवल्याची व्यापारी वर्तुळात चर्चा आहे. या दोन्ही बनावट वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी एक मोठा व्यापारी दिल्ली व मुंबईशी संबंधित असल्याचे बोलले जाते. संबंधित कंपनीच्या सल्लागाराने वरोरा येथे तक्रार करून पोलिसांच्या माध्यमातून कारवाई केली. मात्र, या बनावट वस्तूंचा ठोक व्यापारी कोण, हे शोधणे पोलिसांसाठी आव्हानात्मक आहे.


 

Web Title: The clue came from Delhi; Sale of Fake Harpic in Varora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.