प्रारूप प्रभागरचनेत अद्याप सुचविले नाही आयोगाने बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2022 12:33 PM2022-02-01T12:33:18+5:302022-02-01T12:37:43+5:30
चंद्रपूर मनपा प्रशासने ७७ जागांचा आणि २६ प्रभागांचा कच्चा आराखडा सादर केला आहे. परंतु, प्रारुपात दुरुस्ती करण्याबाबत अद्याप कोणत्याही सूचना नसल्याने अंतिम प्रभाग निश्चित करणे पुन्हा लांबणीवर पडले आहे.
चंद्रपूर : राज्यातील १० महानगरपालिकांच्या नवीन प्रारूप प्रभाग रचनेबाबत राज्य निवडणूक आयोगाने सुधारणा सुचवून अंतिम आराखडा प्रसिद्ध करण्याच्या तारखा जाहीर केल्या. मात्र, अन्य मनपासाेबत चंद्रपूरच्या प्रारुपाबाबत जैसे थे स्थिती असल्याने या आराखड्यासाठी राजकीय पक्ष व इच्छुकांना पुन्हा एप्रिल २०२२ पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार, हे आता स्पष्ट झाले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने २४ डिसेंबर २०२१ पर्यंत चंद्रपुरातील प्रभाग रचनेचा कच्चा प्रारूप आराखडा तयार करण्याचा आदेश दिला होता. मनपाच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य शासनाच्या तीन सदस्यीय प्रभागरचनेनुसार २४ डिसेंबरला प्रारूप आराखडा आयोगाकडे सादर करण्यात आला. निवडणूक आयोगाने मुदत संपलेल्या राज्यातील १० महानगरपालिकांच्या प्रारूप आराखड्यात दुरुस्त्या सुचविल्या आहेत. दुरुस्तीनंतर आक्षेप, तक्रारी व सूचना स्वीकारण्याचा वेळापत्रकही सोमवारी जारी केला. चंद्रपूर मनपा प्रशासने ७७ जागांचा आणि २६ प्रभागांचा कच्चा आराखडा सादर केला आहे. परंतु, प्रारुपात दुरुस्ती करण्याबाबत अद्याप कोणत्याही सूचना नसल्याने अंतिम प्रभाग निश्चित करणे पुन्हा लांबणीवर पडले आहे.
आरक्षण सोडतीचा कार्यक्रम नाही
मनपा प्रारूप प्रभागरचनेच्या प्रक्रियेला विलंब होत असल्याने अंतिम आराखड्याबाबत सध्या जुनीच स्थिती आहे. ज्या १० मनपाच्या प्रभाग रचनेबाबत कार्यक्रम जाहीर झाला. त्यामध्ये आरक्षण सोडतीचा काहीच उल्लेख नाही. त्यामुळे इच्छुकांना वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
२५ प्रभागांत प्रत्येकी ३ नगरसेवक
चंद्रपूर मनपा क्षेत्रातील प्रस्तावित नवीन प्रभाग प्रारूप आराखड्यात ७७ जागा आणि २६ प्रभाग आहेत. त्यामध्ये २५ प्रभागात प्रत्येकी ३ नगरसेवक आणि एका प्रभागात २ नगरसेवक असा एकूण ७७ सदस्यांचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला. आयोग यामध्ये कोणत्या सुधारणा सुचवितो, याकडे अनेकांच्या लक्ष लागले आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडे चंद्रपुरातील नवीन प्रभाग प्रारूप आराखडा यापूर्वीच सादर करण्यात आला आहे. सूचना व दुरुस्तीबाबत कोणताही आदेश मिळाला नाही. आदेश आल्यानंतर पुढील कार्यवाही करू.
-विपीन पालीपाल, आयुक्त मनपा, चंद्रपूर