नागपुरात दोनदा फसला हाजी सरवरला संपविण्याचा कट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 01:58 PM2024-08-16T13:58:30+5:302024-08-16T13:59:32+5:30

गोळीबार प्रकरण : गुन्हेगारांच्या टोळ्यांवर करडी नजर

The conspiracy to kill Haji Sarwar failed twice in Nagpur | नागपुरात दोनदा फसला हाजी सरवरला संपविण्याचा कट

The conspiracy to kill Haji Sarwar failed twice in Nagpur

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :
शहरातील बिनबा गेट परिसरातील हॉटेल शाही दरबारमध्ये कुख्यात गुंड शेख हाजी बाबा शेख सरवर याच्यावर गोळ्या झाडून, चाकूने गळा चिरून सोमवारी हत्या करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांना अटक केली आहे. हाजी सरवरला नागपुरातच संपविण्याचा कट समीरने व त्याच्या साथीदारांनी रचला होता.


दोनदा तसे प्रयत्नही करण्यात आले. परंतु, हे प्रयत्न फसले. मात्र तिसऱ्यांदा कोणत्याही परिस्थितीत सरवरचा गेम करायच्या इराद्याने समीर व त्याचे साथीदार आदल्या दिवशीच चंद्रपुरात दाखल झाले. अचूक संधी साधून सरवरची हत्या केली, अशी माहिती तपासात पुढे आल्याची माहिती पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिली. हाजी सरवरच्या हत्या प्रकरणात घटनेच्या दिवशीच समीर शेख, श्रीकांत कदम, नीलेश ऊर्फ पिंटू ठगे, प्रशांत मालवेली, राजेश मुलकलवार या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.


गोळीबार झाल्यानंतर घटनास्थळावरून पसार झालेल्या सुरेंद्र यादवला पोलिसांनी नागपुरात पथक पाठवून अटक केली. हे सर्व आरोपी पोलिस कोठडीत आहेत. या घटनेनंतर पोलिस गुन्हेगारांच्या टोळ्यांवर करडी नजर ठेवून असल्याची माहिती आहे.


सीडीआर उलगडणार का हत्येचे गूढ?
पैशाची देवाण-घेवाण, गुन्हेगारीतील वर्चस्व, यासह काही वैयक्तिक कारणातून हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी आरोपींचा सीडीआर व डीसीआर घेतला आहे. यातून हत्येचे नेमके गूढ काय आहे, या दृष्टीनेही पोलिस तपास करीत आहेत.


हत्येमागे पुन्हा एकजण 
हाजी सरवरच्या हत्येदरम्यान सातजण घटनास्थळी होते. त्यापैकी सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर एकजण फरार आहे. आरोपीना हत्येसाठी नागपुरातून शस्त्र पुरवठा करण्यात आल्याची माहिती आहे. त्या अनुषंगाने शस्त्र पुरवठा करणाऱ्या आठव्या आरोपींचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
 

Web Title: The conspiracy to kill Haji Sarwar failed twice in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.