आठ फूट खोल खड्ड्यात पडलेल्या गायीला अखेर वाचविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2022 07:30 AM2022-06-23T07:30:00+5:302022-06-23T07:30:09+5:30
Chandrapur News आठ फूट खोल खड्ड्यात पडलेल्या गायीला बाहेर काढून वाचवण्यात चंद्रपूर जिल्ह्यातील गोवरी येथील युवकांना यश मिळाले.
प्रकाश काळे
चंद्रपूर : गाय रस्त्याने जात असताना आठ फूट खोल खड्ड्यात गाय कोसळली. दरम्यान जीव वाचण्यासाठी गायीने जिवाच्या आकांताने हंबरडा फोडला. हा आवाज युवकांच्या कानी पडताच त्यांनी गाईला सुरक्षित खड्ड्यातून बाहेर काढले. ही घटना बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास गोवरी येथे घडली.
गोवरी येथील शेतकरी लटारी लोहे यांच्या मालकीची गाय रस्त्याने जात असताना अचानक गाय रस्त्यालगत शौचालयासाठी खोदलेल्या आठ फूट खोल खड्ड्यात कोसळली. जीव वाचविण्यासाठी गायीने हंबरडा फोडला. हंबरडा ऐकून गावातील नागरिक गोळा झाले. आठ फूट खोल खड्ड्यातून गायीला बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी धडपड चालविली. आपापल्या परीने जमेल तेवढे प्रयत्न सुरू झाले. यात युवकांनी पुढाकार घेतला.
गाईचा जीव वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले गेले. खोल खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी मोठा दोर आणण्यात आला. काहीजण खड्ड्यात उतरले. आठ फूट खोल खड्ड्यातून बाहेर काढणे म्हणजे कसरतीचे काम. मात्र गाईचा जीव वाचला पाहिजे म्हणून गावकरी एकवटले. यात नागरिकांच्या मदतीने युवकांनी पुढाकार घेत गाईला बाहेर काढले. यात खड्ड्यातून गायीला बाहेर काढण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य चेतन बोभाटे, शुभम जुनघरी, रुपेश बोबडे, शंकर मडावी,अनिल मडावी, विकास वाघमारे, विकास पिंपळकर, आकाश गिरी, बादल गिरी, तुफान गिरी, अनिल मादनेलवार, सुधाकर गाजुलवार,ऋषी लांडे आदी युवक व गावकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून गाईला खड्ड्यातून बाहेर काढले.