वहिनीच्या साथीने मुलीने केली आईची हत्या; पुरावेही केले नष्ट अन्..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2022 05:21 PM2022-10-08T17:21:41+5:302022-10-08T17:25:49+5:30
निलेश्वर येथील घटना
सिंदेवाही (चंद्रपूर) : वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वादातून मुलीने वहिनीला सोबत घेऊन आपल्याच आईची हत्या केली. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी गावातील स्मशानभूमीत आईवर अंत्यसंस्कारही उरकले. मात्र, याबाबत दुसऱ्या मुलीने आपल्या आईचा घातपात झाल्याची तक्रार सिंदेवाही पोलिसात केली. त्यानंतर या प्रकरणाचे बिंग फुटले अन् ३ ऑक्टोबरला रात्री नलेश्वर येथे घडलेली घटना उजेडात आली.
तानाबाई महादेव सावसाकडे (६५, रा. नलेश्वर) असे मृतक महिलेचे नाव आहे. तानाबाई सावसाकडे हिचा मृत्यू झाल्यानंतर घरातीलच व्यक्तींनी तिची हत्या केल्याची तक्रार मृत महिलेची मुलगी रंजना रामेश्वर सोनवणे हिने सिंदेवाही पोलिसात केली. तक्रार प्राप्त होताच सिंदेवाहीचे ठाणेदार योगेश घारे यांनी पोलीस उपनिरीक्षक महल्ले यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. तिथे जाऊन मृत महिलेची मुलगी वंदना खाते व सून चंद्रकला सावसाकडे यांना चौकशीकरिता ताब्यात घेण्यात आले.
चौकशीदरम्यान दोन्ही महिलांनी पोलिसांना सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. सखोल चौकशी केली असता मुलगी वंदना हिने तिच्या आईला शेतजमिनीच्या वादातून झालेल्या भांडणामध्ये वहिनी चंद्रकला हिला सोबत घेऊन नाक व तोंड दाबून हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी विविध कलमान्वये आरोपींवर गुन्हा नोंद करून दोन्ही महिलांना अटक केली आहे. पुढील तपास ठाणेदार योगेश घारे करीत आहेत.