क्रूरच... तरुणीला निर्वस्त्र करून मुंडकेच केले धडावेगळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2022 02:10 PM2022-04-04T14:10:25+5:302022-04-05T10:36:55+5:30
मृत युवतीच्या बाजूला मोबाइल चार्जर, हेडफोन, चावी, तरुणीची जुती व चिल्लर पैसे असे आढळून आले, परंतु मुंडके कुठेच आढळून आले नाही.
भद्रावती (चंद्रपूर) : येथील गवराळा परिसरातील शेतशिवारात अंदाजे २५ वर्षीय तरुणीचे मुंडके नसलेले निर्वस्त्र धड शेतशिवारात आढळले. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली. या घटनेची माहिती पोलिसांना होताच, पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. या तरुणीवर अत्याचार करून तिचा खून केला किंवा तिचा नरबळी अशा चर्चांना उधाण आले आहे.
गवराळा शेतशिवारात ढेंगळे यांचे शेत आहे. त्यांच्या बाजूला झाडे यांचे शेत आहे. अमोल झाडे हे पहाटे शेतीच्या कामासाठी गेले असता, त्यांना ढेंगळे यांच्या शेतात निर्वस्त्र अवस्थेत तरुणीचा मुंडके नसलेला मृतदेह दिसला. त्यांनी या घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असता. मृत युवतीच्या बाजूला मोबाइल चार्जर, हेडफोन, चावी, तरुणीची जुती व चिल्लर पैसे असे आढळून आले, परंतु मुंडके कुठेच आढळून आले नाही. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, या घटनेबाबत तर्कवितर्क काढण्यात येत आहेत.
अत्याचार करून हत्या केल्याची शंका
तरुणीचा मृतदेह निर्वस्त्र अवस्थेत आढळला. आरोपीने मुंडके धडापासून वेगळे केले. तरुणीच्या अंगावर कोणताही दागिना नव्हता, तसेच पायात पैंजण व हातात बांगड्या वगैरे नव्हत्या. या तरुणीवर अत्याचार करून पुरावे नष्ट करण्यासाठी तिचे मुंडके धडापासून वेगळे करून घटनास्थळापासून नष्ट केले असावे, अशी शंका पोलिसांकडून उपस्थित केली जात आहे. घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक कुलकर्णी, ठाणेदार गोपाल भारती, फॉरेन्सिक टीम, फिंगर टीम, एक्स्पर्ट पथक दाखल झाले असून, वेगवेगळ्या दिशेने तपास करीत आहेत.
ओळख पटली नाही
सोमवारी पहाटे ही घटना उघडकीस आली आहे. मात्र, आतापर्यंत युवतीची ओळख पटू शकली नाही. परिसरातील पाेलीस ठाण्यात कोणत्याही तरुणीची मिसिंगबाबत तक्रार आली आहे का, याबाबत पोलीस तपास करीत आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आला आहे. या प्रकारात अत्याचार करून हत्या केली आहे की, नरबळीचा प्रकार आहे, याबाबतही पोलीस तपास करीत आहेत.