अटीतटीच्या लढतीत ठरले ५८ गावांचे उपकर्णधार; नेत्यांचे दावे-प्रतिदावे सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 02:52 PM2023-01-12T14:52:08+5:302023-01-12T14:53:39+5:30
बहुमत असलेल्या ग्रामपंचायतीत उपसरपंचपद अविरोध
चंद्रपूर : यंदा पहिल्यांदाच सरपंचपदाच्या थेट निवडीनंतर जिल्ह्यातील ५८ ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदासाठी बुधवारी अत्यंत चुरशीची निवडणूक झाली. निकालानंतर समर्थकांनी ढोल ताश्यांच्या गजरात जोरदार जल्लोष साजरा केला. या निवडणुकीकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. ही निवडणूक पक्षीय चिन्हावर लढविली जात नसली तरी आपल्याच पक्षाचा उमेदवार विजयी झाल्याचे दावे-प्रतिदावे भाजप, काँग्रेस, शेतकरी संघटना, शिवसेना (ठाकरे), वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांकडून केले जात आहेत.
ग्रामपंचायतींची निवडणूक १८ डिसेंबर २०२२ रोजी पार पडली. या निवडणुकीत प्रथमच सरपंचाची थेट निवडणूक झाली. उपसरपंचपदासाठी सरपंचांनाही मतदानाचा अधिकार देण्यात आला होता. सरपंचपदानंतरचे दुसरे महत्त्वाचे पद मिळविण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली. त्यामुळे गावातील राजकारण चांगलेच तापले होते. गटबाजी उफाळून येऊ नये, कोणत्याही परिस्थितीत आपल्या समर्थकांची उपसरपंचपदी वर्णी लागावी, यासाठी राजकीय पक्षांच्या पाठबळाने ग्रामपंचायत सदस्य पर्यटनाला गेले होते. आज बुधवारी हे सर्व सदस्य ऐन मतदानाच्या वेळी गावात हजर झाले. मतदान प्रक्रिया शांततेत व्हावी, यासाठी संवेदनशील गावांमध्ये पोलिसांनी चोख बंदाेबस्त ठेवला होता. निकालानंतर समर्थकांनी ढोल ताश्यांच्या गजरात जल्लोष साजरा केला.
सरपंचपद काँग्रेसकडे तर उपसरपंचद भाजपकडे
यंदा सरपंचपदाची थेट निवडणूक झाल्याने सरपंच व सदस्य वेगवेगळ्या पक्षांचे समर्थक असल्याचे पुढे आले. सरकारच्या निर्णयामुळे सरपंचाला विकासकामे करताना अडचणी येतील, अशी शंका उपस्थित केली जात आहे. त्यातच काही ग्रामपंचायतींमध्ये उपसरपंचपदी भाजपचे समर्थक असताना तिथे उपसरपंचपद काँग्रेसकडे गेले. काही ठिकाणी सरपंच काँग्रेसचा असताना उपसरपंचपद भाजपकडे गेल्याने ग्रामपंचायतींचा कारभार व्यवस्थित चालणार काय, असा प्रश्न युवकांकडून विचारला जात आहे.
सरपंचांनी केले मतदान
ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये पहिल्या फेरीत सरपंच यांना मतदानाचा अधिकार असेल, असे ग्रामविकास विभागाने स्पष्ट केले होते. दोन उमेदवारांना उपसरपंचपदासाठी समसमान मते पडल्यास सरपंचाला निर्णायक मत देण्याचा हक्क होता. जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये सरंपचांना हा हक्क बजावल्याची माहिती आहे.
निवडणूक सभा तहकुबीचा प्रसंगच आला नाही
उपसरपंचपदाची निवडणूक सरपंचाच्या अध्यक्षतेखाली घेणे कायद्याने बंधनकारक होते. त्यामुळे निवडणुकीचे अध्यक्षस्थान भूषवून कार्यवाही करणे हे सरपंचाच्या कर्तव्याचा भाग आहे. निवडणुकीची सभा तहकूब झाल्यास मुंबई ग्रामपंचायत निवडणूक नियम (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम, १९६४ च्या नियम १२ मधील तरतुदीनुसार ती सभा त्या कारणासाठी दुसऱ्याच दिवशी तात्काळ घेण्याच्या सूचना ग्रामविकास विभागाने दिल्या होत्या. जिल्ह्यात तहकुबीचा प्रसंग कुठे घडला नाही.