धडावेगळे केलेले शीर पायाने ठोकरत दूर फेकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2022 09:42 PM2022-11-08T21:42:02+5:302022-11-08T21:42:52+5:30

रात्री १० वाजताच्या सुमारास त्याला सुमित्रनगर तुकूम येथील इमली बारमध्ये दारू पिण्याकरिता सोबत नेले. बारमध्ये आधीच आणखी काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे युवक बसले होते. संशयास्पद परिस्थिती बघून महेश मेश्राम हा बारच्या बाहेर आला व आपल्या मित्राला कारने  घरी सोडून देण्यास सांगितले. बारच्या बाहेर असलेल्या युवकांनी कारचे दार उघडताच त्याच्यावर धारदार शस्त्राने  वार करण्यास सुरुवात केली.

The dismembered head was kicked away | धडावेगळे केलेले शीर पायाने ठोकरत दूर फेकले

धडावेगळे केलेले शीर पायाने ठोकरत दूर फेकले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
दुर्गापूर (चंद्रपूर) : जुन्या वैमनस्यातून महेश मेश्राम (३२, रा. तीर्थरूपनगर, चंद्रपूर) या युवकाची सोमवारी रात्री १०:४५ वाजताच्या सुमारास भर रस्त्यावर धारदार शस्त्राने शीर धडावेगळे करून क्रूरपणे हत्या करण्यात आली. ही थरारक घटना दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या एक किमी परिसरातील सुमित्रनगर तुकूम येथील नायरा पेट्रोल पंपाजवळ  घडली. या प्रकरणात दुर्गापूर पोलिसांनी दोन तर स्थानिक गुन्हे शाखेने आठ जण अशी एकूण दहा आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी धडापासून वेगळे केलेले शीर पायाने ठोकरत - ठोकरत दूर रस्त्याच्या कडेला फेकले, यावरून ही हत्या किती क्रूरपणे करण्यात आली हे लक्षात येते.
महेश मेश्राम हा सोमवारी सायंकाळी ८:३० वाजताच्या दरम्यान  आपल्या काही मित्रांसमवेत एसटी वर्कशॉप चौकात येऊन  बसला होता. काही वेळाने त्यांच्या ओळखीचे दोन युवक तिथे आले. त्यांनी रात्री १० वाजताच्या सुमारास त्याला सुमित्रनगर तुकूम येथील इमली बारमध्ये दारू पिण्याकरिता सोबत नेले. बारमध्ये आधीच आणखी काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे युवक बसले होते. संशयास्पद परिस्थिती बघून महेश मेश्राम हा बारच्या बाहेर आला व आपल्या मित्राला कारने  घरी सोडून देण्यास सांगितले. बारच्या बाहेर असलेल्या युवकांनी कारचे दार उघडताच त्याच्यावर धारदार शस्त्राने  वार करण्यास सुरुवात केली. त्याही परिस्थितीत  महेशने तिथून जवळच असलेल्या नायरा पेट्रोल पंपाकडे पळ काढला. त्या वेळेस परत त्याचा मित्र त्याला वाचविण्याकरिता कार घेऊन तिथे आला असता हल्लेखोरांनी कारच्या काचांची तोडफोड केली. अशातच पाच ते सहा युवकांनी   धारदार शस्त्राने महेशवर  एकामागून एक अनेक वार केले. 
नायरा पेट्रोल पंपावरून काही अंतर पुढे गेल्यावर तो जागीच कोसळला. १०:४५ वाजताच्या सुमारास हल्लेखोरांनी तिथेच भर रस्त्यावर धारदार शस्त्राने त्याचे शीर धडावेगळे केले. भर रस्त्यावर रक्ताचा सडा पसरलेला होता. हल्लेखोरांनी नंतर त्याचे कापलेले मुंडके पायाने ठोकरत - ठोकरत काही अंतरावर नेऊन रस्त्याच्या एका कडेला फेकले. रक्ताच्या स्पष्ट खुणा दिवसाही घटनास्थळी दिसत होत्या. हल्लेखोरांच्या हातात तलवार, कुऱ्हाड, फरशा, लोखंडी पाईपसारखे शस्त्र होते. विशेष म्हणजे दुर्गापूर पोलीस ठाण्यापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर  हा थरार घडला.
याबाबत दुर्गापूर पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच हल्लेखोर पसार झाले होते. पोलिसांनी लगेच मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनाकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी दुर्गापूर पोलिसांनी कलम ३०२, १४३, १४७, १४९, ४२७ भादंवि व सहकलम ४, २५ अन्वये आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करून भागीरथी ठाकूर व शुभम मलीये या दोघांना अटक केली. तर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनीही वेगाने सूत्रे हलवित आठ आरोपींना रात्रीच ताब्यात घेऊन अटक केली. हे आठही आरोपी दूर्गापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पुढील तपास येथील ठाणेदार स्वप्निल धुळे करीत आहेत. रविवारीही या दोन गटांत भांडण झाले होते. त्याचाच वचपा काढण्याकरिता हत्याकांड करण्यात आले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे.

अशी आहेत आरोपींची नावे
अतुल मालाजी अलीवार (२२) व दीपक नरेंद्र खाेब्रागडे (१८) दोघेही रा. समता नगर दूर्गापूर, सिद्धार्थ आदेश बन्सोड (२१) रा. नेरी दूर्गापूर, संदेश सुदेश चोखांद्रे (१९) रा. सम्राट अशोक वार्ड, दूर्गापूर, सुरज दिलीप शहारे (१९) रा. समता नगर वार्ड दूर्गापूर, साहेबराव उत्तम मलिये (४५) रा. समता नगर वार्ड दूर्गापूर, अजय नानाजी दुपारे (२४) रा. उर्जानगर कोंडी दूर्गापूर, प्रमोद रामलाल सूयर्यवंशी (४२) रा. उर्जानगर दूर्गापूर यांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली तर भगीरथी ठाकूर व शुभम मलिये यांना दूर्गापूर पोलिसांनी अटक केली. 

तपासात बजावली महत्त्वाची भूमिका
पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, संदीप कापडे व मंगेश भोयर, पोलीस उपनिरीक्षक कावळे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तर दूर्गापूरचे ठाणेदार स्वप्निल धुळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपींना अल्पावधीत अटक करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

पळून जाणाऱ्या आरोपींना सिनेस्टाईल अटक
हत्या केल्यानंतर आरोपी नागपूरच्या दिशेने पळून जात असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना सिनेस्टाईल पाठलाग केला. नागपूर मार्गावर वर्धा जिल्ह्यातील आरंभा नाका येथे वाहनावर संशय येताच पोलिसांनी आपले वाहन आडवे लावले. यानंतर मोठ्या शिताफिने आरोपींना अटक करण्यात यश मिळविले.

 

Web Title: The dismembered head was kicked away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.