भर पावसात जिल्हाधिकाऱ्यांनी केली शेतात जाऊन धानाची रोवणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 04:35 PM2023-07-17T16:35:48+5:302023-07-17T16:36:39+5:30
जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी गोंडपिपरी तालुक्यातील बोरगाव येथील सुरेश भसारकर यांच्या शेतात एस.एस.आय (श्री) पद्धतीने भात रोवणीचा शुभारंभ केला.
वढोली (चंद्रपूर) : दोन दिवसापूर्वी पूर परिस्थितीच्या उपाययोजनेबाबत ऑनफिल्ड असणारे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी शनिवारी भर पावसात धानाच्या शेतात हजेरी लावली. यावेळी त्यांच्या हस्ते 'श्री' पद्धतीने भात रोवणीचा शुभारंभ करण्यात आला.
जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी गौंडपिपरी तालुक्यातील बोरगाव येथील सुरेश भसारकर यांच्या भात खाचरात एसआरआय (श्री) पद्धतीने भात रोवणीचा शुभारंभ केला. भाताची लागवड रोपे तयार असून, पुरेशा पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. पाण्याची सोय असलेल्या ठिकाणी भात लागवडीने वेग धरला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः भात खाचरात शेतकरी, लागवड करणाऱ्या महिलांसोबत संवाद साधत भात रोवणी केली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, उपजिल्हाधिकारी स्नेहल रहाटे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नागदेवते, कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, तहसीलदार शुभम बहाकर उपविभागीय कृषी अधिकारी गिरीश कुलकर्णी, तालुका कृषी अधिकारी सचिन पानसरे तसेच क्षेत्रीय कर्मचारी आणि शेतकरी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी तण व्यवस्थापन, माती परीक्षणानुसार सुयोग्य खताचा वापर करण्याबाबत सूचना दिल्या. तसेच सुधारित पद्धतीने भात लागवड करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले. डॉ. नागदेवते यांनी पेर भात, टोकन पद्धतीने भात लागवडीच्या अर्थशास्त्राची माहिती दिली. श्री पद्धतीने लागवड केल्यास पारंपरिक पद्धतीपेक्षा फुटव्यांची संख्या वाढवून ४० ते ५० पर्यंत असल्याने हेक्टरी उत्पन्नात १० क्विंटलपर्यंत वाढ होत 'आहे, असे सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांची सोयाबीन प्रकल्पाला भेट
जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी गोंडपिपरी तालुक्यातील तारसा बु. येथे राष्ट्रीय खाद्यतेल अभियानअंतर्गत. जसविंदरसिंग सुच्चासिंग पन्नू यांच्या शेतातील सोयाबीन पिकाच्या प्रात्यक्षिक प्रकल्पाला भेट दिली. सरी वरंब्यावरील सोयाबीन टोकन यंत्राच्या सहाय्याने लागवड करण्यात आलेल्या क्षेत्राची यावेळी त्यांनी पाहणी केली. कृषी विभागाकडून मानव विकास योजनेमधून देण्यात आलेल्या टोकन यंत्रांच्या सहाय्याने पेरणीचे प्रात्यक्षिक जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.