वयोमर्यादेमुळे 'त्या' बेरोजगार युवकांचे प्रशिक्षणार्थी शिक्षक बनण्याचे स्वप्न भंगले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 02:55 PM2024-08-30T14:55:15+5:302024-08-30T15:00:45+5:30
Chandrapur : वयोमर्यादेत वाढ करण्याची युवकांची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : शासनाने 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना' सुरू केली असून या योजनेअंतर्गत जिल्हा परिषद प्रशासन लगबगीने कार्यवाही करून जिल्हा परिषद शाळांवर बेरोजगारांमधून प्रशिक्षणार्थी शिक्षक म्हणून नियुक्ती देणार आहे. त्यासाठी डी.एड. व बी.एड. पदविका प्राप्त युवकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. मात्र, यामध्ये केवळ १८ ते ३५ वयोगटाची मर्यादा असल्याने ३५ वर्षांवरील बेरोजगार युवकांचे प्रशिक्षणार्थी शिक्षक बनण्याचे स्वप्न भंगले आहे.
त्यामुळे शासकीय नोकर भरतीमध्ये मगासावर्गीयांना असलेली वयोमर्यादा याही योजनेत लागू करण्यात यावी, अशी मागणी बेरोजगार युवकांकडून केली जात आहे. युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी शासनाने 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना' सुरू केली आहे. बेरोजगारीवर मात करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग व जिल्हा परिषद प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या स्तरावर अहर्ताधारक उमेदवारांना प्रशिक्षणार्थी शिक्षक म्हणून नियुक्ती देण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
मात्र, वयाची १८ ते ३५ वयोगटाची मर्यादा असल्याने मागील अनेक वर्षांपासून डी.एड. व बी.एड. पदविका प्राप्त करून नोकर भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या व ३५ वर्षांवरील अनेक बेरोजगार युवकांच्या प्रशिक्षणार्थी शिक्षक बनण्याच्या आशेवर पाणी फेरले आहे. त्यामुळे शासकीय नोकर भरतीत ज्या प्रमाणे मागासवर्गीय उमेदवारांना वयाची सूट दिली जाते, त्याच प्रमाणे या योजनेमध्येही अशी सूट लागू करण्यात यावी, अशी मागणी बेरोजगार युवकांकडून केली जात आहे.
"वर्ष २००८ मध्ये डी.एड. पूर्ण झाले. तेव्हापासून केवळ एकदाच शिक्षक भरती घेण्यात आली. त्यानंतर एकदाही शिक्षक भरती झाली नाही. त्यामुळे वय वाढत गेले. शासनाने शासकीय नोकर भरतीमध्ये मागासवर्गीयांना असलेली वयाची मर्यादा 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना' यामध्ये लागू करावी. जेणेकरून आम्हाला प्रशिक्षणार्थी शिक्षक बनण्याची संधी मिळेल."
- लीलाधर गुरुनुले, डी.एड. पदविकाधारक युवक
"माझे बी.एड. पूर्ण झाले आहे. मात्र, शिक्षक भरती न झाल्याने माझे वय वाढले आहे. शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना'मध्ये वयाची कालमर्यादा वाढवावी, जेणेकरून प्रशिक्षणार्थी शिक्षक तरी बनण्याचे स्वप्न पूर्ण होईल."
- विनोद जीवतोडे, बी.एड. पदवीधारक युवक