चालकाचा फाजील आत्मविश्वास नडला; ३५ प्रवाशांची खाजगी बस पुरात अडकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2022 10:10 PM2022-07-13T22:10:10+5:302022-07-13T22:10:49+5:30

Chandrapur News मध्यप्रदेशातून येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सच्या बसचालकाने चिंचोली नाल्यातून बस टाकली. अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने पुरामध्ये ही बस अडकली.

The driver was overwhelmed; A private bus carrying 35 passengers got stuck in the flood | चालकाचा फाजील आत्मविश्वास नडला; ३५ प्रवाशांची खाजगी बस पुरात अडकली

चालकाचा फाजील आत्मविश्वास नडला; ३५ प्रवाशांची खाजगी बस पुरात अडकली

Next
ठळक मुद्देसर्वच प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले :

चंद्रपूर : गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे राजुरा तालुक्यातील अनेक गावांतील शेती पुराच्या पाण्याखाली आली असून, गावागावांतील ओढ्यांना सर्वत्र पूर आला आहे. वर्धा नदीच्या पुलावर पाणी आल्याने राजुरावरून चंद्रपूरकडे जाणारा राज्यमार्ग बंद झाला आहे. दरम्यान, मध्यप्रदेशातून येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सच्या बसचालकाने चिंचोली नाल्यातून बस टाकली. अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने पुरामध्ये ही बस अडकली. यामुळे ३५ प्रवाशांचा जीव धोक्यात आला. विरूर पोलिसांनी धाडसी कामगिरी दाखवीत प्रवाशांचे प्राण वाचविले. ही घटना बुधवारी घडली.

महाराष्ट्रातील तेलंगणा सीमेलगत येणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या राजुरा तालुक्यातील चिंचोली येथील नाल्याच्या पुलावर पाणी वाहत होते. त्यामुळे विरूरपासून सिरपूर, कागजनगरकडे जाणारी वाहतूक ठप्प आहे. मध्यप्रदेशातून येणारी ही ट्रॅव्हल्स हैदराबादकडे जात होती. बुधवारी सकाळीच पोलिसांनी हा मार्ग पूर्णपणे बंद केला होता; परंतु ट्रॅव्हल्सच्या चालकाने न जुमानता बस पाण्यात घातली. मात्र पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने बस नाल्यातच अडकली. त्यामुळे प्रवासी जिवाच्या आकांताने आरडाओरड करू लागले. त्यामुळे विरूरचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण हे आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. अडकलेल्या ३५ प्रवाशांमध्ये लहान मुलांची संख्या अधिक होती. त्यामुळे आधी मुलांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर इतर प्रवाशांनाही विरूर पोलिसांच्या पथकाने सुखरूप बाहेर काढले.

Web Title: The driver was overwhelmed; A private bus carrying 35 passengers got stuck in the flood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :floodपूर