बापाने हातरुमालाने आवळला 10 वर्षीय दिव्यांग मुलीचा गळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2022 11:22 PM2022-10-04T23:22:12+5:302022-10-04T23:22:51+5:30
हत्या केल्यानंतर नैसर्गिक मृत्यू दाखवण्यासाठी वडिलांनी पत्नीला फोन करून मुलीची प्रकृती खालावल्याचे सांगितले. दरम्यान, पत्नी धावत घरी आली. तिच्या मदतीने स्वतःच मुलीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्या मुलीची तपासणी केल्यानंतर तिच्या गळ्यावर व मानेवर काही खुणा आढळून आल्या. त्यामुळे डॉक्टरांचा संशय बळावला. त्यांनी लगेच घटनेची माहिती पोलिसांना दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : १० वर्षीय दिव्यांग मुलीची हातरुमालाने गळा आवळून बापानेच हत्या केली. एवढ्यावरच न थांबता आपले बिंग फुटू नये म्हणून मुलीचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचा बनाव केला. मात्र, डॉक्टरांना संशय येताच तिचे शवविच्छेदन करण्यात आले. आठवडाभरानंतर शवविच्छेदन अहवाल आला अन् सारा प्रकार पुढे आला. चित्रपटात शोभावी, अशी ही धक्कादायक घटना चंद्रपुरातील श्यामनगर येथे घडली. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे.
विजय नारायण बारापात्रे (४६, रा. श्यामनगर) असे आरोपी बापाचे नाव आहे. तर मृणाली विजय बारापात्रे (१०) असे मृत मुलीचे नाव आहे.
विजय बारापात्रे याची मुलगी मृणाली नावाची मुलगी दिव्यांग होती. ती उठत बसत नसल्याने ती बेडवरच झोपून राहत होती. तिची प्रात:विधी आई- वडिलांनाच करावी लागत होती.
२३ सप्टेंबरला मुलीची आई बाहेर गेली होती. दरम्यान, त्या मुलीने बेडवरच शौच केली. हा प्रकार बघितल्यानंतर संतापलेल्या बापाने हातरुमालाने मुलींचा गळा आवळून निर्घृणपणे हत्या केली. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल गोपाले, पोलीस हवालदार सुदाम राठोड, पोलीस शिपाई मंगेश सायंकार यांच्या पथकाने तपास करीत बापाला अटक केली. पोलिसांनी मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास ठाणेदार राजेश मुळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल गोपाले करीत आहेत.
नैसर्गिक मृत्यू दाखविण्यासाठी केले रुग्णालयात भरती
हत्या केल्यानंतर नैसर्गिक मृत्यू दाखवण्यासाठी वडिलांनी पत्नीला फोन करून मुलीची प्रकृती खालावल्याचे सांगितले. दरम्यान, पत्नी धावत घरी आली. तिच्या मदतीने स्वतःच मुलीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्या मुलीची तपासणी केल्यानंतर तिच्या गळ्यावर व मानेवर काही खुणा आढळून आल्या. त्यामुळे डॉक्टरांचा संशय बळावला. त्यांनी लगेच घटनेची माहिती पोलिसांना दिली. सोमवारी शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर गळा आवळून हत्या केल्याचे पुढे आले. त्यामुळे रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल गोपाले यांनी तपास करून वडिलांना ताब्यात घेतले. त्याला खाकी हिसका दाखवला असता त्याने हत्या केल्याचे कबूल केले. पोलिसांनी कलम ३०२, २०२ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.