चंद्रपुरात झाली पहिली रोबोटिक जॉइंट प्रत्यारोपण शस्त्रक्रिया
By परिमल डोहणे | Published: February 28, 2024 06:00 PM2024-02-28T18:00:58+5:302024-02-28T18:01:27+5:30
एका ६५ वर्षीय महिलेला चालताना गुडघ्यामध्ये त्रास होत होता. त्या उपचारासाठी डॉ. प्रसन्न मद्दीवार यांच्याकडे आल्या होत्या.
चंद्रपूर : एका ६५ वर्षीय महिलेच्या झिजलेल्या गुडघ्यावर प्रगत तंत्रज्ञानाने रोबोटिक जॉइंट प्रत्यारोपण शस्त्रक्रिया बुधवार (दि. २८ फेब्रुवारी) रोजी चंद्रपुरातील कुबेर हॉस्पिटलमध्ये अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रसन्न मद्दीवार यांनी केली. जिल्ह्यातील ही पहिली रोबोटिक जॉइंट प्रत्यारोपण शस्त्रक्रिया असल्याचे डॉ. मद्दीवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले आहे. सुमारे एक तास चाललेल्या या शस्त्रक्रियेनंतर ती महिला दुसऱ्या दिवशीपासून चालायला लागणार आहे.
एका ६५ वर्षीय महिलेला चालताना गुडघ्यामध्ये त्रास होत होता. त्या उपचारासाठी डॉ. प्रसन्न मद्दीवार यांच्याकडे आल्या होत्या. त्यांनी संपूर्ण तपासणी केली असता, त्यांचा गुडघा झिजला असून बाक आल्याचे निदान झाले. त्याच्यावर शस्त्रक्रिया करुन खराब झालेले हाड काढणे गरजेचे होते. त्यामुळे अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रसन्न मद्दीवार यांनी रोबोट या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून जिल्ह्यातील पहिली रोबोटिक जॉइंट प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली. एक तास चाललेल्या या शस्त्रक्रियेत कमीत कमी हाड कापून यशस्वी शस्त्रक्रिया केली. त्यामुळे आता त्या महिलेची चालताना होणाऱ्या त्रासातून मुक्ती होणार आहे.
रोबोटिक शस्त्रक्रियेदरम्यान हाडाची क्वालिटी, साइज याचे योग्य परीक्षण केले जाते. त्यानंतर बंदुकीसारख्या असलेल्या मशीनने अनावश्यक व खराब झालेले गरजेचे तेवढेच हाड कापले जाते. बुधवारी जिल्ह्यातील पहिली अशी रोबोटिक जॉइंट प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली.
-डॉ. प्रसन्न मद्दीवार, अस्थिरोगतज्ज्ञ, चंद्रपूर