चक्क लीजवर घेतलेला तलावच मासेमारांनी कोरडा केला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2022 05:00 AM2022-05-06T05:00:00+5:302022-05-06T05:00:43+5:30
ब्रह्मपुरी येथील देलनवाडी वाॅर्डातील तलाव (सर्व्हे नं. २७४) सन २०१६ - १७ ते २०२० - २१ या कालावधीकरिता अध्यक्ष, सचिव वाल्मीकी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था यांना मासेमारीकरिता वार्षिक चार हजार रुपयांत देण्यात आला होता. कोरोना महामारीमुळे कालावधी वाढवून देण्यात आला. त्यामुळे यावर्षीही मासेमारी करण्यात आली. तलावात किमान तीन फूट पाणी असावे, असे निर्देश असताना सदर संस्थेने अधिक उत्पन्न घेण्याच्या लालसेने चक्क मोटारपंप लावून संपूर्ण तलावातील पाणी बाहेर काढले.
दत्तात्रय दलाल/ अनुप पानतावणे
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी /अड्याळ : पंचायत समिती ब्रह्मपुरींतर्गत तालुक्यातील छोटे - मोठे तलाव मासेमारीकरिता विविध मच्छीमार सहकारी संस्थांना देण्यात येतात. काही अटी व शर्थींचे पालन या संस्थांना करावे लागते. मात्र, या नियमांना झुगारून येथील देलनवाडी वाॅर्डातील तलावातील पाणी मोटारपंप लावून आटविल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे या भागात गुरेपालकांना जनावरांच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
ब्रह्मपुरी येथील देलनवाडी वाॅर्डातील तलाव (सर्व्हे नं. २७४) सन २०१६ - १७ ते २०२० - २१ या कालावधीकरिता अध्यक्ष, सचिव वाल्मीकी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था यांना मासेमारीकरिता वार्षिक चार हजार रुपयांत देण्यात आला होता. कोरोना महामारीमुळे कालावधी वाढवून देण्यात आला. त्यामुळे यावर्षीही मासेमारी करण्यात आली. तलावात किमान तीन फूट पाणी असावे, असे निर्देश असताना सदर संस्थेने अधिक उत्पन्न घेण्याच्या लालसेने चक्क मोटारपंप लावून संपूर्ण तलावातील पाणी बाहेर काढले. त्यामुळे हे तलाव पूर्णतः वाळले आहे. बाजूच्या परिसरात शेती असून या भागात गुरेढोरे चरतात. म्हशी, गायी व बकऱ्या या तलावातील पाणी पितात. त्यामुळे येथील पाणी गुरांना पिण्यासाठी उपयुक्त होते. मात्र, सदर संस्थेने तलावातील संपूर्ण पाणी मोटारपंप लावून बाहेर काढले. त्यामुळे संपूर्ण तलाव आटले आहे.
लगतच्या परिसरातील विहिरी व हातपंपाच्या पाण्याची पातळी खोल गेली आहे. भर उन्हाळ्यात या भागात पाण्याची भीषण समस्या निर्माण होऊ शकते. पंचायत समितीने सदर संस्थेवर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी आता केली आहे.
तालुक्यातील इतर लीजवरील तलावांचे काय ?
सन २०२१ - २२ मध्ये तालुक्यातील एकूण १२४ तलाव मासेमारीकरिता विविध संस्थांना लीजवर देण्यात आले आहेत. यातील ६७ तलावांना मुदतवाढ देण्यात आली आहे. यातील किती तलावांमध्ये अटीनुसार पाणी शिल्लक आहे. ते पंचायत समितीने तपासणे गरजेचे आहे. अनेक तलावांत अधिक उत्पन्न कमाविण्याच्या लालसेने संपूर्ण तलाव आटविण्यात येतात. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तर गुरांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते. याकडे लक्ष देऊन तालुक्यातील तलावांची पाणी पातळी नियमानुसार कायम आहे काय, हे पं.स.ने तपासणे गरजेचे आहे.
पंचायत समितीमार्फत वाल्मीकी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था यांना सक्त ताकीद देऊन पत्र किंवा नोटीस देण्यात येईल. संस्थेवर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
- डॉ. शिरीष रामटेके
संवर्ग विकास अधिकारी ( प्रभारी )
पंचायत समिती, ब्रह्मपुरी.