आजोबाच्या अंत्यसंस्काराला आलेल्या नातवाचीही निघाली अंत्ययात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2022 03:38 PM2022-04-01T15:38:24+5:302022-04-01T16:02:59+5:30
आजोबाचा मृतदेह घरी असताना अशा बिबट्या हल्ल्याच्या विचित्र घटनेतून त्याच दिवशी आठ वर्षीय नातवाचाही मृत्यू झाल्याने संबंधित कुटुंबावर शोककळा पसरली.
अजिंक्य वाघमारे
दुर्गापूर (चंद्रपूर) : आजोबाच्या अंत्यसंस्कारासाठी बाहेर गावावरून आलेल्या नातवाला बिबट्याने ठार केल्याने आजोबाच्या घरून सोबतच नातवाचीही एकाच वेळेस अंत्ययात्रा काढण्यात आली. एकाच वेळी ऊर्जानगर नेरी येथील स्मशानभूमीत दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या हृदयद्रावक घटनेने उपस्थितांना अश्रू अनावर झाले होते.
ऊर्जानगर नेरी येथील समता नगरात बुधवारी तेजराम मेश्राम यांचे वृद्धापकाळाने निधन झाले होते. त्यांचा नातू प्रतीक बावणे हा आपल्या आईसह भद्रावती येथून आला होता. लांबून आणखी काही नातेवाईक येणार असल्याने बुधवारी होणारे अंत्यसंस्कार गुरुवारी करण्यात येणार होते. अंत्यसंस्कारासाठी आलेले सर्व नातेवाईक शोकाकुल वातावरणात घरी बसले होते. रात्री आठ ते नऊच्या सुमारास येथे आलेल्यापैकी काही मुले व नातवंडे हे घरामागे गप्पा गोष्टीत मग्न होते. अशातच एक बिबट्या दबा धरून बसला असल्याची यत्किंचीतही कल्पना या मुलांना नव्हती. यापैकी प्रतीक बावणेवर बिबट्याने काही कळायच्या आत पाठीमागून हल्ला केला व काळाचा घाला पडला. त्याच्या मानेचा घोट घेत त्याला ओढत लगतच्या झाडाझुडपात नेऊन ठार केले.
आजोबाचा मृतदेह घरी असताना अशा बिबट्या हल्ल्याच्या विचित्र घटनेतून त्याच दिवशी आठ वर्षीय नातवाचाही मृत्यू झाल्याने संबंधित कुटुंबावर शोककळा पसरली. बुधवारी दिवसाच आजोबांवर अंत्यसंस्कार झाले असते तर कदाचित आजोबासोबत नातवाची अंत्ययात्रा निघाली नसती. अखेर नियतीने डाव साधला. नातू आजोबाच्या अंत्ययात्रेत सहभागी होण्याकरिता आला. मात्र, आजोबासोबत नातवाचीही अंत्ययात्रा काढावी लागली. यावेळी अंत्यविधीत सहभागी प्रत्येक नागरिकाचे डोळे पाणावले होते.
अत्यंत शोकाकुल अशा वातावरणात ऊर्जानगर नेरी येथील स्मशानभूमीत नातवाला मूठमाती देऊन पुरण्यात आले तर आजोबाला अग्नी देऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.