गोंडपिपरी-खेडी राज्य महामार्ग झाला आहे अक्षरश: मरणमार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2022 05:00 AM2022-03-23T05:00:00+5:302022-03-23T05:00:08+5:30

कंत्राटदाराने दिरंगाईच्या आरोपातून बचावात्मक पवित्रा घेत जलदगतीने काम करण्याच्या नादात रस्त्याच्या दोन्ही बाजूस गिट्टी पसरवून ठेवली. या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे मरणयातनाच. कंत्राटदाराकडून दिरंगाई व गुणवत्तेची तपासणी करावी. मार्गाचे काम  लवकर पूर्ण करून दिलासा द्यावा, अशी मागणी  या मार्गाने प्रवास करणाऱ्यांकडून होत आहे.

The Gondpipri-Khedi state highway has literally become a death trap | गोंडपिपरी-खेडी राज्य महामार्ग झाला आहे अक्षरश: मरणमार्ग

गोंडपिपरी-खेडी राज्य महामार्ग झाला आहे अक्षरश: मरणमार्ग

Next

वेदांत मेहरकुळे
 लोकमत न्यूज नेटवर्क
गोंडपिपरी :  गेल्या अनेक वर्षांपासून नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या गोंडपिपरी - मूल या मार्गाला सध्या मरणवाटेचे स्वरुप आले असून, या मार्गावर सुरू असलेल्या अपघातांच्या मालिकेत अनेक जणांचा जीव गेला आहे. 
या मार्ग निर्मितीचे काम सलग तीन वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे. तसेच मार्ग निर्मितीच्या कामात कंत्राटदाराने दोन्ही बाजूस गिट्टी पसरल्याने येथील प्रवाशांना रोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. अपघाताची दाट शक्यता बळावली आहे.
गोंडपिपरी शहराच्या उत्तरेकडे जाणाऱ्या गोंडपिपरी खेडी हा मार्ग मूल - नागपूर या महामार्गाला जोडणारा मार्ग म्हणून अस्तित्त्वात आला. सुरुवातीला एकेरी मार्ग असताना या मार्गावरून होणाऱ्या वाहतुकीत प्रचंड वाढ झाल्याने या मार्गाचे दुहेरी मार्गात रूपांतर झाले होते. त्यानंतरच्या काळात दिवसागणिक वाहतुकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने मागील पंचवार्षिक भाजप सरकारने हायब्रीड योजनेंतर्गत कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून देऊन नूतनीकरणातून त्रिपदरी मार्ग करण्यासाठी सत्ताकाळ संपुष्टात येण्याच्या तोंडावर मोठ्या लगीनघाईने कामाचे उद्घाटन करण्यात आले होते. कामाचे कंत्राट एसआरके हैदराबाद या कंपनीला मिळताच मार्गाचे एका बाजूचे खोदकाम करून ठेवले. यानंतर मात्र सलग दोन वर्षापर्यंत या मार्गावर केवळ निर्मिती कामाचा टेंभा मिरवून थातूरमातूर खड्डे बुजवले. शासनाच्या डोळ्यात धूळफेक करून मार्ग निर्मितीचे काम सुरू असल्याचे भासविले गेले.

न्यायालयात याचिकाही दाखल
अशातच तालुक्यातील करंजी येथील एसटी महामंडळातील वाहन चालक कर्तव्यावरून गावाकडे येताना दुचाकीचा अपघात होऊन जागेवरच मरण पावला. तसेच खेडी मार्गावर पंचायत समितीचे माजी सभापती संजय मारकवार यांचेही अपघाती निधन झाले. कंत्राटदाराच्या या दिरंगाई धोरणाचा विरोध करीत स्थानिक मार्गावरील नांदगाव येथील सरपंच वाकुडकर यांनी वारंवार तक्रार करूनही बांधकाम विभागाला जाग न आल्याने थेट न्यायालयात याचिका दाखल करून संबंधित कंत्राटदारावर कारवाईची मागणी केली होती.

कामाची तपासणी करावी
कंत्राटदाराने दिरंगाईच्या आरोपातून बचावात्मक पवित्रा घेत जलदगतीने काम करण्याच्या नादात रस्त्याच्या दोन्ही बाजूस गिट्टी पसरवून ठेवली. या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे मरणयातनाच. कंत्राटदाराकडून दिरंगाई व गुणवत्तेची तपासणी करावी. मार्गाचे काम  लवकर पूर्ण करून दिलासा द्यावा, अशी मागणी  या मार्गाने प्रवास करणाऱ्यांकडून होत आहे.

राज्य महामार्ग क्र.१३९  चे निर्मिती कार्याची पाहणी दरम्यान योग्य नसलेले काम परत फोडून नव्याने करण्यास कंत्राटदाराला आदेश दिले आहे. तसेच सदर काम गुणवत्ता दर्जा नुसारच पूर्ण होईल.
- अनंत भास्करवार कार्यकारी अभियंता सा. बां. विभाग २ चंद्रपूर.

 

Web Title: The Gondpipri-Khedi state highway has literally become a death trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.