पावसाचा कहर, कपाशीचे शेत नेले खरवडून; शेतात नालासदृश स्थिती
By साईनाथ कुचनकार | Published: July 21, 2023 06:22 PM2023-07-21T18:22:28+5:302023-07-21T18:22:45+5:30
कोरपना तालुक्यातील हिरापूर येथील शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
चंद्रपूर: यावर्षी पावसाने उशिराने हजेरी लावली. त्यामुळे शेती हंगाम उशिराने सुरु झाला. शेतकऱ्यांनी कसेबसे करून पेरणी केली. पीक उगवले मात्र मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने चक्क शेत खरवडून नेले असून, चक्क शेतामध्येच नालासदृश स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे कोरपना तालुक्यातील हिरापूर येथील शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
मागील चार ते पाच दिवसांपासून जिल्ह्यात संततधार सुरू आहे. १८ जुलै रोजी चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील काही गावांना पावसाचा तडाखा बसला. कोरपना तालुक्यातील हिरापूर येथील शेतकरी मारोती आगलावे यांचे शेत येथील संदीप काळे यांनी ठेकापद्धतीने शेती करण्यासाठी यावर्षी घेतले. त्यांनी शेतामध्ये कपाशी लावली. जेमतेम कपाशीची उगवणी झाली असताना आलेल्या पावसात शेत खरवडून नेले आहे. यामध्ये शेतामध्ये नालासदृश स्थिती निर्माण झाली आहे. लावलेले कपाशीचेही नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, सध्या शासनाच्या वतीने पीक विमा काढण्यासंदर्भात आवाहन केले जात आहे. त्याची मुदत ३१ जुलैपर्यंत आहे; मात्र या शेतकऱ्याचे पीक विमा काढण्यापूर्वीच मोठे नुकसान झाले आहे.